बंगळूर; पुढारी ऑनलाईन
मुलगा शिकत नाही अथवा तो बेकार असल्याने मुलाला मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. पण बंगळूरमध्ये एका व्यक्तीने त्याच्या २५ वर्षीय मुलाला आर्थिक वादातून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका घटनेत एका ५१ वर्षीय फॅब्रिकेशन व्यावसायिकाने वाल्मिकी नगर, चामराजपेट येथे आर्थिक वादातून त्याच्या २५ वर्षीय मुलाला पेटवून दिले. यात मुलगा गंभीर भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या वडिलाला अटक केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
सुरेंद्र कुमार असे आरोपीचे नाव असून, त्याच्या मुलाचे नाव अर्पित सेटिया असे आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा तीन वर्षांपासून वडिलांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय चालवत होता. पण व्यवसाय व्यवस्थित सांभाळत नसल्याची वडिलांची तक्रार होती. मुलाने व्यवसायासाठी १.५ कोटीचे कर्ज घेतले होते. हे कर्ज थकल्याने मुलगा आणि वडिलांमध्ये नेहमी वाद होत होता. १ एप्रिल रोजी सुरेंद्रने मुलग्याला व्यवसायाशी संबंधित अकाउंट पाहण्यास सांगितले होते. पण त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. यावरुन दोघांमध्ये वाद झाला.
अर्पित गोदामातून पहिल्यांदा बाहेर पडतो. तो पूर्णपणे भिजलेला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. त्यांच्या अंगावर थिनर टाकण्यात आले होते. त्यानंतर त्याचा वडील बाहेर येतो आणि अर्पितला रोखण्याऐवजी तो काडी पेटवून त्यांच्या अंगावर टाकतो. त्यानंतर आगीचा भडका उडतो. आग पेटलेल्या अवस्थेत अर्पित धावत सुटतो. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आजूबाजूचे लोक आग विझवून त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतात. पण गंभीर भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू होतो. या प्रकरणी बंगळूर पोलिसांनी वडिलाला अटक केली आहे. या घटनेने बंगळूर शहर हादरून गेले आहे.
हे ही वाचा :