Latest

Ahmednagar Accident : मोठा अनर्थ टळला! खचाखच भरलेली एसटी बस चारीत कोसळली; महिलांसह अनेक शालेय विद्यार्थी जखमी

अमृता चौगुले

वाळकी / चिचोंडी पाटील : पुढारी वृत्तसेवा : क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसला भरधाव वेगात आलेल्या टँकरने हूल दिल्याने बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चारीत कोसळली. ही घटना नगर- जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटीलच्या (ता.नगर) शिवारात सोमवारी (दि.11) सकाळी 8.30 ते नऊच्या दरम्यान घडली. या अपघातात प्रवासी बालंबाल बचावले असून, बसमधील 10 ते 12 विद्यार्थी, महिला व इतर, असे 15 ते 20 प्रवासी जखमी झाले आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी आगाराची एसटी बस (एम.एच 40 एन.9240) ही सोमवारी सकाळी 8.30च्या सुमारास आष्टीकडून नगरकडे जात होती. या मार्गावर सकाळी 7.30 पासून 8.30 वाजेपर्यंत एकही बस न आल्याने चिचोंडी पाटील बसस्थानकात शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, असे जवळपास 25 ते 30 जण बसच्या प्रतीक्षेत उभे होते. ही बस येतानाच प्रवाशांनी फुल भरलेली होती. तरीही चिचोंडी पाटीलमधील सर्व प्रवासी त्यात दाटीवाटीने बसले. काही जण उभे राहून प्रवास करत होते.

चिचोंडीतून बस पुढे निघाल्यावर 300 ते 400 मीटर अंतरावर स्वागत हॉटेल समोर भरधाव वेगात आलेल्या टँकरने हूल दिली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ही बस रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चारीत जावून कोसळली. अचानक झालेल्या या अपघातात बसमधील सर्व प्रवासी घाबरून आरडाओरडा करू लागले. या बसच्या मागेच सरपंच शरद पवार यांची गाडी होती.

ते नगरकडे येत होते. त्यांनी तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. बसमध्ये प्रवास करणारे नगर तालुका अपंग प्रहार संघटनेचे संघटक बाबासाहेब सोंडकर यांनीही चिचोंडी पाटील गावातील काहींना मदतीसाठी फोन करून बोलावून घेतले. बसच्या अपघाताची माहिती मिळताच भाजप किसान सभेचे बबनराव शेळके, अशोक कोकाटे, प्रवीण कोकाटे, बाजीराव हजारे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना अपघातग्रस्त बसमधून बाहेर काढले.

ग्रामीण रुग्णालयात उपचार

जखमी विद्यार्थी, तसेच प्रवाशांना 108 रुग्णवाहिका, खासगी वाहनांद्वारे चिचोंडी पाटीलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात आले. या अपघातात अनेक प्रवाशांना डोक्याला, तोंडाला, हाताला व पायाला जखमा झाल्या आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT