Latest

पुण्यात बैलगाडा शर्यतीत दुर्घटना; स्टेज कोसळून एकाचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

अमृता चौगुले

पुणे /फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा : बैलगाडा शर्यतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नागरिकांना बसण्यासाठी लावण्यात आलेला स्टेज कोसळल्याने एक जण जागीच ठार झाला, तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना वडकीतील रामदर्‍याजवळ रविवारी दुपारी घडला.
बाळासाहेब काशिनाथ कोळी (वय 46, निमाम पाडळी, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर शुभम विजय लोखंडे (वय 24, भोर, रा. पुणे), मयूर प्रमोद लोखंडे (वय 25) आणि विकास वाल्मीक ढमाले (वय 24, रा. रा. पिंपरी वळण, ता. राहुरी, जि. अहमदनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडकी गाव येथे रविवारी दुपारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात

नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी स्टेज तयार केला होता. दुपारी अचानक पाऊस आल्याने नागरिकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी बैलगाडीचा आश्रय घेतला, तर काही जण ट्रकच्या आडोशाला बसले. चौघे पावसापासून बचाव करण्यासाठी लोखंडी स्टेजच्या खाली बसले. जोरदार पाऊस पडल्याने ही लोखंडी स्टेज चिखलात खचून चौघांच्या अंगावर पडली. चौघेही या स्टेजखाली दबून जखमी झाले. चौघांनाही रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असता यामध्ये बाळासाहेब काशिनाथ कोळी यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वडकी येथील या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, सुप्रिया सुळे येणार होते. शर्यतीसाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊन जोरदार तयारी करण्यात आली होती. परंतु, अचानक आलेला पाऊस व त्यानंतर घडलेली दुर्घटना, यामुळे शर्यतीला गालबोट लागले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT