Latest

बुलढाणा : किल्ले शिवनेरीवर ‘भगवा जाणीव आंदोलन’ करणार – अमोल कोल्हे

स्वालिया न. शिकलगार

बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा- किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळी भगवा ध्वज का लावला जात नाही ? का लावू दिला जात नाही? पुरातत्त्व खात्याचा बाऊ करून शिवप्रेमींच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचे आता खपवून घेतले जाणार नाही. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. आम्हाला माती, माता आणि मातृभूमी सर्वाधिक प्रिय आहे. किल्ले शिवनेरीवर भगवा ध्वज फडकवण्यासाठी 'भगवा जाणीव' अभियानातून रणसिंग फुंकणार असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.

बुलढाणा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या उद्घाटनासाठी आले असता अभिनेते तथा खा. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी 'भगवा जाणीव आंदोलना'बाबत ते म्हणाले," इंग्रजांनी त्याकाळी आणलेले कायदे इंग्रज गेल्यानंतरही आज तसेच पाळले जात आहेत. पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून शिवप्रेमींच्या अस्मितांवर घाला घातल्या जात आहे. शिवनेरी किल्ला आमची अस्मिता आहे.

शिवरायांचा जन्म तेथे झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांसाठी राजकारण व धर्मकारणाच्या पलीकडचे व्यक्तिमत्व आहे. शिवनेरीवर त्यांच्या जन्मस्थळी मोठा भगवा ध्वज असावा हे तमाम शिवप्रेमींचे स्वप्न आहे. मात्र या ठिकाणी भगवा लावू दिला जात नाही. याबाबत आपण शासनाचे वारंवार लक्ष वेधले. सन २०२१ पासून आमचा संघर्ष सुरू आहे. यासाठी संसदेतही आवाज उठविला. मात्र त्याला प्रतिसाद नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'भगवा जाणीव आंदोलन' केले जाणार आहे. या आंदोलनात राज्यातील शिवभक्तांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी केले.

शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार

किल्ले शिवनेरीवर १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतो. मात्र, सामान्यजनांना या सोहळ्यात सहभागी होऊ दिले जात नाही. शिवरायांनी स्वराज्यात सामान्यजनाला केंद्रबिंदू मानले, त्यालाच मज्जाव केला जात आहे. यंदा आपण सामान्य लोकांसोबत खांद्यावर भगवा ध्वज घेऊन शिवनेरीवर जाणार आहोत. मात्र तेथील सर्व शासकीय कार्यक्रमांवर माझा बहिष्कार असेल असे खा. अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT