Latest

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक १० सप्टेंबर रोजी घेण्याची कुलगुरूंकडून जाहीर करण्यात आल्यानंतर सर्वच विद्यार्थी संघटना कामाला लागल्या होत्या. उबाठा प्रणित युवासेना, मनसे, छात्रभारती, अभाविप या विद्यार्थी संघटनांनी आपल्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र गुरूवारी रात्री उशीरा मुंबई विद्यापीठाकडून पुढील आदेशापर्यंत निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे, उबाठा प्रणित युवासेनेकडून या निर्णयाचा जोरदार निषेध आला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२)(त) मधील तरतुदीनुसार अधिसभेवर १० नोंदणीकृत पदवीधर निवडणून देण्याची तरतूद आहे. या निवडणूक अधिसूचनेनुसार मुंबई विद्यापीठाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र १७ ऑगस्ट २०२३ राेजी व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार १० सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात येणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक अधिकारी प्रा. सुनील भिरूड यांनी पत्रकाद्वारे जाहीर केला. या निर्णयाचा सर्व विद्यार्थी संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे. तसेच उबाठा प्रणित युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे.

सर्व प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या विशेष सभेत निर्णय घेऊन अनिश्चित काळासाठी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, शिंदे सरकारला त्यांचा पराभव आणि जवळपास १२ लोकसभा मतदार संघातील मतदारांचा कौल आपल्या विरुद्ध जाणार आणि जनतेमध्ये शासनाच्या प्रतिमेचा बट्ट्याबोळ उडणार या भितीने शासनाने हि निवडणुक स्थगित केली आहे त्याचा आम्ही युवासेना माजी सिनेट सदस्य तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.

अर्ज भरण्याची तारीख शुक्रवारी असताना हा निर्णय घेतल्याने सरकारपुढे विद्यापीठ झुकले असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
शैक्षणिक संस्थात राजकारण सरकार आणले जात आहे. विद्यार्थी प्रश्न सुटण्यासाठी सिनेटमध्ये पदवीधर सदस्यांची गरज मोठी असते. त्यांच्यामूळे अनेक प्रश्न सुटतात मात्र या निवडणुकीतच राजकारण का आणले जात आहे. निवडणूक घेण्याची गरज असताना विद्यापीठाने स्थगित का केली हा गंभीर प्रश्न आहे. हा निर्णय पुन्हा मागे घेऊन निवडणुका घ्याव्यात अशी मागणी मनसेचे सुधाकर तांबोळी यांनी केली.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता सर्व योग्य पध्दतीने सुरु होते परिपत्रक निघून शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि अचानकपणे शासन निर्णयानुसार मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केल्याचे कळवले सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षांच्या युवा आघाडी व विद्यार्थी आघाडीची तयारी नसल्यामुळे आणि या निवडणुकीमध्ये आपला पराभव हा निश्चित होणार आहे हे लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला आहे छात्रभारती विद्यार्थी संघटना याचा तीव्र निषेध करते.

ज्यावेळेस निवडणुकीत आपल्याला जिंकता येणार नाही असे लक्षात येते त्यावेळेस निवडणूक स्थगित करणं निवडणुकीचा कालावधी पुढे ढकलने अशा प्रकारचा एक चुकीचा पायंडा हे शासन पाडतंय याचा आम्ही धिक्कार करतो. अशी टीका छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे रोहित रमेश ढाले यांनी केली आहे.

.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT