पिंपरी : डोमिसाईल, उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची धावपळ | पुढारी

पिंपरी : डोमिसाईल, उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची धावपळ

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयांसाठी तसेच विविध सरकारी योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदींसाठी लागणारे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) त्याचप्रमाणे, उत्पन्न दाखले आदींसाठी सध्या नागरिकांची धावपळ सुरू आहे. शहरातील नागरिक सुविधा केंद्र आणि महा ई-सेवा केंद्र आदी ठिकाणी दररोज सरासरी 300 ते 350 दाखल्यांची मागणी नोंदविली जात आहे.
पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाकडून त्यातील सरासरी 250 ते 300 दाखले वितरित केले जात आहेत. दरम्यान, तहसील कार्यालयाकडे सध्या दीड हजार दाखले पेंडिंग आहेत.

शहरामध्ये 1 नागरिक सुविधा केंद्र आणि 110 महाईसेवा केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रामध्ये आठवडाभरापूर्वी दररोज 400 ते 500 दाखल्यांसाठी अर्ज येत होते. सध्या ही संख्या 300 ते 350 दाखल्यांपर्यंत आली आहे. तहसील कार्यालयाकडून त्यातील दररोज किमान 250 ते 300 दाखले वितरित केले जात आहेत.

चार महिन्यांत 21 हजार उत्पन्न दाखले वितरित

पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाकडून चार महिन्यांत 21 हजार उत्पन्न दाखले वितरित करण्यात आले आहेत.
शैक्षणिक कारणांसाठी त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी अर्ज करणार्‍या नागरिकांकडून प्रामुख्याने त्यासाठी मोठी मागणी करण्यात आली. अर्ज केल्यानंतर नागरिकांना सात ते आठ दिवसांत दाखले देण्याचा तहसील कार्यालयाकडून प्रयत्न केला जात असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रवीण ढमाले यांनी दिली.

आठवडाभरापूर्वी वाढली होती मागणी

आठवडाभरापूर्वी डोमिसाईल आणि उत्पन्न दाखल्यांना नागरिकांची मागणी वाढली होती. महापालिकेच्या आकुर्डी आणि उद्यमनगर-पिंपरी या गृहप्रकल्पासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यापूर्वी 28 जुलैपर्यंत मुदत होती. ही मुदत वाढवून 12 ऑगस्टपर्यंत करण्यात आली. त्यामुळे 12 ऑगस्टपूर्वी डोमिसाईल, उत्पन्न दाखले मिळावे म्हणून नागरिकांची धावपळ सुरू होती. दरम्यान, आता पुन्हा 27 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्यांना दाखले वेळेत मिळविता आले नव्हते त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे.

सध्या सर्व्हर डाऊनची कोणतीही समस्या जाणवत नाही. त्यामुळे दाखले देण्यासाठीदेखील अडचण नाही. नागरिकांना किमान सात दिवसांत दाखले दिले जात आहेत. आठवडाभरापूर्वी दररोज 400 ते 500 दाखल्यांसाठी अर्ज येत होते. सध्या हे प्रमाण घटले आहे.

– अर्चना निकम, तहसीलदार, पिंपरी-चिंचवड

हेही वाचा

नाशिक जिल्ह्यात शंभर एकरमध्ये आयटी हब उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत

सोलापूर एसटी स्थानक बनले चोरांचे आगार; एसटी स्थानकात प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर, कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणाच नाही

तिहार तुरुंगात असलेल्या यासिन मलिकची पत्नी पाकच्या मंत्रिमंडळात

Back to top button