पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण? या चर्चेला आज ( दि.११) पूर्णविराम मिळाला. मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केला. (MP CM Mohan Yadav)
मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. आणि शिवराज सरकारमध्ये मंत्री होते. मोहन यादव हे आरएसएसचे अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांच्या नावाची घोषणा अत्यंत धक्कादायक मानली जात आहे. यादव यांनी मोठ्या संघर्षानंतर राजकारणात स्थान मिळवले आहे. उच्च शिक्षणमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. ते भाजपचे प्रस्थापित नेते असून उज्जैन विभागातील बड्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. ते २ जुलै २०२० रोजी शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले. त्यांच्याकडे उच्च शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. २५ मार्च १९६५ रोजी उज्जैन येथे जन्मलेल्या मोहन यादव यांनी विक्रम विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. MP CM Mohan Yadav
माधव विज्ञान महाविद्यालयातून विद्यार्थी चळवळीतून राजकारणाला सुरुवात केलेले डॉ. मोहन यादव यांना मंत्रीपदापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल ४१ वर्षे संघर्ष करावा लागला. १९८२ मध्ये ते माधव विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी संघाचे सहसचिव होते. १९८४ मध्ये ते विद्यार्थी संघाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उज्जैनचे नगर मंत्रिपद आणि १९८६ मध्ये विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. १९८८ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्य प्रदेशचे राज्य सहसचिव आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. ते १९८९- ९० मध्ये परिषदेच्या राज्य युनिटचे राज्यमंत्री आणि १९९१-९२ मध्ये परिषदेचे राष्ट्रीय मंत्री राहिले आहेत. १९९३-९५ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उज्जैन नगरचे सह-विभाग सचिव होते. १९९६ मध्ये ते साई भाग नगर विभागाचे सचिव होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सक्रिय सहभागामुळे त्यांनी १९९७ मध्ये बीजेवायएम राज्य समितीमध्ये स्थान देण्यात आले. १९९८ मध्ये ते पश्चिम रेल्वे बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्यही झाले. यानंतर त्यांनी संस्थेत विविध पदांवर काम केले. २००४-२०१० दरम्यान, ते उज्जैन विकास प्राधिकरणाचे (राज्य मंत्री दर्जाचे) अध्यक्ष होते. ते २०११- २०१३ मध्ये मध्य प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळ, भोपाळचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) देखील झाले. २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. २०१८ मध्येही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत ते पुन्हा विजयी झाले. २०२० मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्य़ानंतर मोहन यादव पुन्हा मंत्री झाले.
डॉ. मोहन यादव उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचा जन्म २५ मार्च १९६५ रोजी झाला. वडिलांचे नाव पूनमचंद यादव. मोहन यादव यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांनी पीएचडीही केली आहे. यासोबतच त्यांनी एमबीए आणि एलएलबीही केले आहे. त्यांचा व्यवसाय कृषी क्षेत्राशीही संबंधित आहे.
मोहन यादव यांना २०२० मध्ये निवडणूक आयोगाने अश्लील भाषेबद्दल नोटीस बजावली होती. तसेच निवडणूक प्रचारावर एक दिवस बंदी घालण्यात आली होती. यासोबतच त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेतला होता.
हेही वाचा