Latest

Mainpuri Lok Sabha: मैनपुरीत डिंपल यादवविरुद्ध भाजपचे जयवीरसिंह ठाकूर मैदानात

अविनाश सुतार

दिल्ली पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी (दि.१०) आपल्या नऊ उमेदवारांची दहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत ७ उमेदवार उत्तरप्रदेशातील तर प्रत्येकी एक उमेदवार पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश चंडीगडमधील आहे. भाजपने समाजवादी पक्षाचा गड मानला जाणाऱ्या उत्तरप्रदेशातील मैनपुरी मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांच्याविरोधात जयवीरसिंह ठाकूर यांना मैदानात उतरवले आहे. Mainpuri Lok Sabha

मैनपुरी येथून समाजवादी पक्षाचे नेते स्व. मुलायमसिंग यादव पाचवेळा खासदार होते. त्यांच्या स्नुषा डिंपल यादव तीन वेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्या दोनदा कन्नौज मतदारसंघातून तर एकदा मैनपुरी येथून खासदार राहिल्या आहेत. मैनपुरीतून त्यांनी लोकसभेची पोटनिवडणूकही जिंकली होती. मैनपुरीत समाजवादी पक्षाने दहा वेळा विजय मिळविला आहे. त्यामध्ये दोन पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. Mainpuri Lok Sabha

भाजपने बलिया मतदारसंघातूनही आपल्या उमेदवाराची घोषणा केली. बलियातून माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे सुपुत्र नीरज शेखर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय उत्तरप्रदेशातील कौशंबी (एससी), फूलपूर, प्रयागराज, मछलीशहर (एससी), गाझीपूर या मतदारसंघातील उमेदवारही भाजपने जाहीर केले आहेत.

Mainpuri Lok Sabha : उत्तरप्रदेशातील ७० उमेदवारांच्या नावांची घोषणा

उत्तरप्रदेशातील एकूण ८० लोकसभा मतदारसंघांपैकी आतापर्यंत ७० उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. उर्वरित दहा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी सोडले आहेत. त्यामुळे आता केवळ पाच मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा उरलेली आहे. भाजपने केंद्रशासित प्रदेश चंडीगड येथून संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे. एस. एस अहलुवालिया यांना पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगऐवजी आसनसोलमधून मैदानात उतरवण्यात आले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT