पुढारी ऑनलाईन : अयोध्येतील श्रीराम मंदिर २३ जानेवारी रोजी सर्वसामान्यांसाठी मंदिर खुले केले जाणार आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली. दरम्यान, राम मंदिराच्या आंदोलनात आघाडीवर राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (BJP veterans LK Advani) आणि मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आरोग्याशी संबंधित कारणांमुळे उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. राम मंदिर ट्रस्टने याबाबतची माहिती दिली आहे. (Ram Mandir inauguration)
संबंधित बातम्या
अयोध्येतील राम मंदिराची उभारणी करणारी संस्था श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, माजी उपपंतप्रधान अडवाणी आणि माजी मानव संसाधन विकास मंत्री जोशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत.
ते पुढे म्हणाले की, "१५ जानेवारीपर्यंत प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण केली जाईल. प्राण प्रतिष्ठेसाठी पूजा १६ जानेवारीपासून सुरू होईल आणि ती २२ जानेवारीपर्यंत चालेल," यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला आमंत्रित केलेल्या लोकांची सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की, 'दोघेही (अडवाणी आणि जोशी) परिवारातील ज्येष्ठ आहेत आणि त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना न येण्याची विनंती करण्यात आली आहे आणि दोघांनीही मान्य केली आहे.' अडवाणी यांचे वय आता ९६ वर्षांचे आहेत आणि जोशी पुढील महिन्यात ९० वर्षांचे होतील.
"या सोहळ्यासाठी सुमारे चार हजार संतांना आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय २,२०० इतर पाहुण्यांनाही आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी या प्रमुख मंदिरांचे प्रमुख, धार्मिक आणि संवैधानिक संस्थांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आल्याचे राय यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, अध्यात्मिक गुरू दलाई लामा, केरळच्या माता अमृतानंदमयी, योगगुरू बाबा रामदेव, अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, इस्रोचे संचालक निलेश देसाई यांच्यासह अनेक नामवंत व्यक्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांनी पुढे सांगितले, २२ रोजी मंदिराच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर संघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आणि सर्व विश्वस्त मंदिराच्या प्रांगणात उपस्थित असतील. पुढच्याच दिवशी मंदिर सर्वांसाठी खुले होईल. अचानक गर्दी उसळू नये म्हणून राज्यनिहाय परवानगीच्या तारखा वाटून देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. (Ram Mandir inauguration)