Latest

BJP Sthapna Diwas : राष्ट्रप्रथम हेच भाजपचे उद्दिष्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मी भाजपच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या रक्त आणि घामाने पक्षाला समृद्ध करणाऱ्या भाजपच्‍या ज्येष्ठ नेते आणि  कार्यकर्त्यांमुळेच आपल्याला देशसेवेचे सौभाग्य मिळाले आहे. भाजप हा असा पक्ष आहे ज्यासाठी देश नेहमीच सर्वोच्च राहिला आहे. त्यामुळे 'राष्ट्रप्रथम' हेच भाजपाचे एकमेव उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भाजपच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त  पक्षातील नेत्यांना ते संबोधित करत होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले, "आज हनुमान जयंती आहे. भाजप देखील बजरंगबलीला आपले शक्तीस्थान मानते. आमचा पक्ष, आमचे कार्यकर्ते हनुमानाची मूल्ये आणि शिकवणीतून प्रेरणा घेतात. आज भारताला बजरंगबलीसारख्या महान शक्तींची जाणीव होत आहे, भारत महासागरासारख्या मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी खूप मजबूत झाला आहे. याच प्रेरणेतून भाजपनेही काही गोष्टींचे निकाल लावण्याचे, जनतेचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. यापुढेही देखील असेच प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

आज देशासमोर भाजप विकासाचा एकमेव पर्याय आहे. भाजप सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राने काम करत आहे. आम्ही आमच्या हृदयात आणि कार्यशैलीमध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. भाजपची कार्यशैली सर्वांना सामावून घेणारी आहे. सामाजिक न्यायासाठी भाजप सदैव कार्यरत राहिल." घराणेशाहीला नाकारत भाजपाने  देशातील वंचित गरीबांना एक नवीन आवाज दिला आहे.मोठी स्वप्न पाहणे आणि ती वास्‍तवात उतरवणे ही भाजप राजकीय संस्कृती आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस आणि त्यांच्यासारख्या पक्षांची संस्कृती ही आहे की छोटा विचार करणे आणि कमी मिळवल्यावर आनंदी होणे. एकमेकांच्या पाठीवर थाप मारण्यात ते आनंदी आहेत, तर भाजपची राजकीय संस्कृती मोठी स्वप्ने पाहण्याची आणि अधिक साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची असल्याचेही पीएम मोदी म्हणाले.

सामाजिक न्याय हा आपल्यासाठी राजकीय घोषणाबाजीचा भाग नसून, आपल्यासाठी विश्वासाचा लेख आहे. आज नव्या राजकीय संस्कृतीचे भाजप नेतृत्व करत आहे. भाजप हा विकास आणि विश्वासाचा एकमेव पर्याय आहे. देशाच्या विजयाच्या प्रवासात मुख्य सेवक म्हणून आपली भूमिका बजावत आहे. सामाजिक न्यायाच्या नावाखाली अनेक राजकीय पक्षांनी देशाशी खेळ केला आहे. त्यांनी लोकांचे नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचे कल्याण केले आहे, असे म्हणत पीएम मोदींनी काँग्रेसवर निशाना साधला आहे.  पण आज कोणताही भेदभाव न करता, खर्‍या अर्थाने सामाजिक न्यायाचा हेतू साकारण्यासाठी भाजप प्रयत्नशिल असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.

भारत मातेला देशातील दुष्कृत्यांपासून मुक्त करण्यासाठी कठोर व्हावे लागले, तर कठोर व्हा! असा संदेश देखील पीएम मोदींनी कार्यकर्त्यांना स्थापणा दिनी दिला. एक भारत, श्रेष्ठ भारत' हा भारतीय जनता पक्षाचा मंत्र आणि ध्येय आहे. जनसंघाचा जन्म झाला तेव्हा आपल्याकडे ना फारसा राजकीय अनुभव होता, ना पुरेशी साधने होती. भाजपाने लोकशाहीच्या उदरातून जन्म घेतला आहे, लोकशाहीच्या 'अमृत'ने भाजपला जोपासले गेले आहे आणि संविधान, लोकशाहीला बळकटी देण्यासाठी पवित्र केले आहे.  आमचा सुरुवातीपासूनच लोकशाहीची जननी असलेल्या देशातील लोकांच्या बुद्धी आणि मूल्यांवर गाढ विश्वास आहे. हा विश्वास दिवसेंदिवस अधिकाधिक दृढ होत असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT