Latest

BJP leader Sana Khan Murder case | भाजप नेत्या सना खानच्या मारेकऱ्यांना आणले नागपुरात

मोहन कारंडे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम नागपूर भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या सना खान यांची आर्थिक वादातून हत्या झाल्याचे उघड झाले असून एप्रिलमध्ये मारेकरी अमित आणि सना यांचे लग्नही झाल्याचे उघडकीस आले आहे. जबलपूर येथून कुख्यात गुन्हेगार असलेल्या अमित शाहू व त्याच्यासोबत या हत्याकांडात सहभागी दोन सहकाऱ्यापैकी एकाला अटक केल्यानंतर त्यांना घेवून पोलीस पथक नागपुरात पोहचले. दरम्यान, एक टीम अजूनही तिसऱ्या आरोपीच्या शोधात जबलपूरला तळ ठोकून आहे.

आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मानकापूर पोलीस स्टेशनच्या निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी दिली. दरम्यान, आरोपीने हत्येची कबुली दिली असली तरी सना खान यांच्या मृतदेहाचा अजूनही पत्ता न लागल्याने पोलिस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह कायम आहे. नदीत बऱ्याच दूरपर्यंत सराईत पोहणाऱ्यांनी शोध घेतला तरी मृतदेह सापडलेला नाही हे वास्तव तपासात गुंतलेल्या पथकालाही अस्वस्थ करणारे आहे.

१ ऑगस्टला सना खान रात्री तडकाफडकी नागपूरवरून जबलपूरला गेल्या. सकाळी पोहचल्याचा फोन आला मात्र नंतर कुठलाही संपर्क न झाल्याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार आईने मानकापूर पोलिसात दिली. अखेर कुटुंबियांच्या पोलीस तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांची दोन पथके जबलपूरकडे रवाना झाली. अमित शाहूच्या घरून सकाळी भांडणाचा आवाज आल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, स्थानिक पोलिसांच्या असहकारापोटी शोधमोहीमेत आठवडा उलटूनही थांगपत्ता न लागल्याने व्यावसायिक स्पर्धेतून हत्येचा संशय व्यक्त केला गेला. पोलिसांनी सुरुवातीला सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, तपासात अमितचा भाऊ मनीष व ढाब्यावरील नोकर जितेंद्र गौड यास ताब्यात घेतले. २ ऑगस्टला ही हत्या झाली मृतदेह नदीत फेकला व 3 ऑगस्टला त्यानेच रक्ताचे डाग असलेले कपडे नदीत फेकले, कार धुतल्याचे सांगितल्यानंतर अमितवर अपहरणाचा गुन्हा नोंदवला गेला. पुन्हा पोलिस जबलपूरकडे रवाना झाले.

पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर पोलिसांच्या दोन टीम जबलपूरला सना खानचा शोध घेण्यासाठी यापूर्वीच रवाना झाल्या होत्या. व्यावसायिक संबंधातून या दोघांचे सूत जुळले. इतकेच नव्हे तर या दोघांनी एप्रिलमध्ये लग्नही केल्याचे तपासात उघड झाले असून कुटुंबियांना थांगपत्ता नसल्याचे समजते. त्यांचा भाऊ मोहसीन खान यानेही यास दुजोरा दिल्याची माहिती आहे. आता आर्थिक कारणावरून की आणखी कशातून ही हत्या करण्यात आली याचा उलगडा लवकरच पोलिस तपासात होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT