अजित पवारांनी घेतला मेट्रोचा आढावा ; म्हणाले, “शिवाजीनगर- हिंजवडीच्या कामाला गती द्या”

अजित पवारांनी घेतला मेट्रोचा आढावा ; म्हणाले, “शिवाजीनगर- हिंजवडीच्या कामाला गती द्या”

पुणे : पुढारी ऑनलाईन: पुण्यातील दोन मेट्रो मार्गिकांचं नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर मेट्रोच्या पुढच्या टप्प्याच्या कामाला गती मिळाली आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.अजित पवार म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित असणाऱ्या मेट्रोसह एकात्मिक दोन मजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्याबरोबरच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याच्यादृष्टीने प्रकल्पासाठी आवश्यक असणारी शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी महानगरपालिका तसेच पोलिसांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे.

गणेश खिंड रॅम्पसाठी आवश्यक 45 मीटर रुंदीचा रस्त्याच्या जागेचा ताबा (आरओडब्ल्यू) सर्व कार्यवाही करून 15 सप्टेंबरपर्यंत देण्यात यावा. यासाठी पुणे महानगरपालिकेने आवश्यक कार्यवाही करावी. औंध, बाणेर, पाषाण, गणेश खिंड रॅम्प येथील बॅरिकेडिंग करणे, आवश्यक तेथे वाहतूक वळविणे आदी कामे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

या प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा ताब्यात घेण्याच्यादृष्टीने उशीर होऊ नये, असे निर्देश देत उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित जागांशी निगडित असणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांशी फोनवरून थेट संपर्क साधत सूचना केल्या. तसेच खासगी जागांबाबतही त्यांच्या जागामालकांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. पुढील 50 वर्षांचा विचार करुन प्रकल्पाच्या आराखड्यात तडजोड होता कामा नये, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news