नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यात तरुणीच्या हत्येवरून भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीला लक्ष्य केले आहे. महिलांविरुद्ध पश्चिम बंगालमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. ममता बॅनर्जींनी बंगालला कन्यांवर अन्याय करणारे राज्य बनविले आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर इंडिया आघाडीचे म्हणणे काय आहे, असा सवाल भाजप नेत्या आणि परराष्ट्र राज्यमंत्री मिनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) यांनी केला.
बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यात हात बांधून आणि गळा चिरलेल्या अवस्थेतील तरुणीचे शव आढळल्याचा व्हिडीओ भाजपच्या आयटी विभागाचे प्रभारी आणि पश्चिम बंगालचे सहप्रभारी अमित मालविय यांनी सोशल मिडियावरून प्रसारित केला होता. तसेच, पश्चिम बंगालमधील महिलांच्या संरक्षणात अपयशी ठरलेल्या ममता बॅनर्जींना राहुल गांधी प्रश्न विचारणार काय, असा सवाल अमित मालवीय यांनी केला. यानंतर भाजप दिल्लीतील नेत्या व परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले. (Meenakshi Lekhi)
मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, २४ परगणा येथे आढळलेला महिलेचा मृतदेह, पश्चिम बंगालमध्ये महिलांविरुद्धचे अपराध सातत्याने कसे वाढत आहेत, याची आठवण करून देणारा आहे. (मा, माटी मानूष (आई, माती आणि माणूस) अशी घोषणा देणाऱ्या ममता बॅनर्जींनी राज्याला बॉम्ब, गोळ्या आणि महिलांवरील अत्याचाराचे केंद्र बनविले आहे. यावर इंडिया आघाडीचे लोक काहीही बोलत नाही, असा प्रहार देखील मिनाक्षी लेखी यांनी केला. प्रशासनाला कर्तव्य बजावण्यासाठी सांगण्याऐवजी लोकांना दोष देणारा मुख्यमंत्री मिळाला की, गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळते.
लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे बलात्काराच्या घटना वाढत आहेत, हे ममता बॅनर्जींचे म्हणणे म्हणजे सरकार आणि पोलिसांऐवजी जनतेलाच जबाबदार मानणे आहे, असाही टोला मिनाक्षी लेखी यांनी लगावला. भाजप शासीत मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये बारा वर्षा्चया मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री मीनाक्षी लेखी यांनी पीडितेला मदत करणाऱ्या आणि रुग्णालयात नेणाऱ्या आश्रमाचे आभार मानले. तसेच पीडितांबद्दल समाजाने संवेनशीलता दाखवावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
हेही वाचा