पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाला मोठी गळती लागली आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करूनही हे राजीनामा सत्र थांबायला तयार नाही. मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी आठवड्यापूर्वी राजीनामा दिला आणि आमदार महेश लांडगे यांना धक्का दिला. पाठोपाठ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खंद्या समर्थक पिंपळे गुरवच्या नगरसेविका चंदा राजू लोखंडे यांनीही दोनच दिवसांपर्वी भाजपला रामराम केला.
आता पिंपळे निलखचे नगरसेवक तुषार कामठे यांनी गुरुवारी आपल्या नगरसेवकपदाचा आणि भाजपचा त्याग केला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अजित गव्हाणे यांच्याकडे आल्यानंतर ही तिसरी विकेट असून आणखी २२ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने सत्ताधारी भाजपाचे नेते, पदाधिकारी हादरले आहेत.
नगरसेवक तुषार कामठे यांनी आपला राजीनामा पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य प्रवक्ते योगेश बहल, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे उपस्थित होते. स्थानिक नेत्यांच्या हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा दिला आहे असे कामठे यांनी सांगितले.