Latest

new political parties : राज्यात नवीन राजकीय पक्षांचे जन्म, स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर आणखी हलणार ’पाळणे’

backup backup

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तोंडावर नवीन राजकीय पक्ष जन्म घेऊ लागले आहेत. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 5 महानगरपालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे आणखी काही पक्षांचे 'पाळणे' हलण्याची शक्यता आहे. (new political parties)

राज्य निवडणूक आयोगाकडे 2019 व 2020 मध्ये प्रत्येकी 6 तर 2021 मध्ये 15 राजकीय पक्षांनी नोंदणी केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचा अपवाद वगळता महाराष्ट्रात पक्ष नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली असावी, अशी शक्यता राज्य निवडणूक आयोगातील एका अधिकार्‍याने व्यक्त केली आहे.

new political parties : राज्यात आतापर्यंत नोंदणीकृत पक्षांची संख्या 284 इतकी

दीड वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट असल्याने 6 राजकीय पक्षांनी नोंदणी केली. राज्यात आतापर्यंत नोंदणीकृत पक्षांची संख्या 284 इतकी झाली आहे. यातील 16 पक्ष हे पक्षचिन्ह मिळालेले मान्यताप्राप्त पक्ष तर उर्वरित अमान्यता प्राप्त पक्ष आहेत.

नव्याने नोंदणी झालेल्या पक्षांमध्ये अकोला विकास योद्धा मंच, डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन पार्टी (यवतमाळ), भुसावळ परिवर्तन लोकसेवा आघाडी (जळगाव), हिंदवी बहुजन सेवा (नांदेड), निफाड शहर विकास आघाडी (नाशिक) ,राष्ट्रीय जनमंच सेक्युलर (अहमदनगर), कृष्णा भीमा विकास आघाडी (सोलापूर), लोकशाही विकास आघाडी (सांगली) आदींचा समावेश आहे.

2020 मध्ये वंचित बहुजन आघाडी, हिंदुस्तान विकास पक्ष (पुणे), भारतीय ट्रायबल पार्टी (नाशिक), आमचं ठरलय विकास आघाडी (कोल्हापूर), मराठवाडा बहुजन विकास आघाडी (औरंगाबाद), वरणगाव शहर विकास आघाडी (जळगाव), सामान्य जनता पार्टी (ठाणे), जनता की पार्टी (गोंदिया) या नव्या राजकीय पक्षांनी नोंदणी केली आहे.

मार्च 2022 पर्यंत 10 महानगरपालिकांच्या मुदती समाप्त

मार्च 2022 पर्यंत 10 महानगरपालिकांच्या मुदती समाप्त होत आहेत. तर 8 महानगरपालिकांच्या मुदती डिसेंबर 2022 च्या आत संपत आहेत.पंचवीस जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 283 पंचायत समितीच्या मुदती मार्च/एप्रिल 2022 पर्यंत संपत आहेत. डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत 222 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या मुदती संपणार आहेत.

भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या 15 पंचायत समितींच्या आणि सुमारे 100 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या मुदती यापूर्वीच संपल्या आहेत.

या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी नवीन राजकीय पक्ष उदयास येतील, अशी शक्यता राज्य निवडणूक आयोगातील एका अधिकार्‍याने व्यक्त केली.

निवडणुका संपल्यानंतर हे पक्ष केवळ कागदोपत्रीच राहतात, असे हा अधिकारी म्हणाला.

मुदती संपलेल्या पाच महानगरपालिका

– नवी मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली आणि वसई- विरार.

मार्च- एप्रिल 2022 मध्ये मुदती संपणार्‍या महानगरपालिका

– मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर.

डिसेंबर 2022 मध्ये मुदती संपणार्‍या महानगरपालिका

– भिवंडी/ निजामपूर, पनवेल, मीरा- भाईंदर, मालेगाव, परभणी, लातूर, नांदेड- वाघाळा आणि चंद्रपूर.

SCROLL FOR NEXT