Latest

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

नंदू लटके

उदगीर : पुढारी वृत्तसेवा
उदगीर येथे होणाऱ्या नियोजित 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येथे झालेल्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. हे संमेलन मार्च महिन्यात उदगीरला होणार आहे.

उस्मानाबाद येथे झालेल्या संमेलनात फ्रान्सिस दिब्रिटो आणि नाशिक येथे झालेल्या संमेलनात जयंत नारळीकर यांची निवड झाली होती. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सक्रिय अध्यक्षाचा आग्रह धरल्यानंतर सासणे यांच्या नावावर सहमती झाली. मराठवाडा साहित्य परिषद आणि उदयगिरी महाविद्यालय या संमेलनाच्या आयोजक संस्था आहेत. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ यांनीही सासणे यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संमेलन लांबणीवर पडण्याची शक्यता व्‍यक्‍त होत आहे.

प्रशासकीय अधिकारी ते प्रसिद्ध कथाकार…

भारत सासणे यांचा जन्‍म २७ मार्च १९५१ रोजी जालना येथे झाला. बीड येथे जिल्हाधिकारी आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी त्यांनी शासकीय सेवा बजावली. ते सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. जॉन आणि अंजिरी पक्षी हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८० मध्ये प्रकाशित  झाला. त्यानंतरचे कँप व बाबीचे दुःख (१९८२), लाल फुलांचं झाड (१९८४), चिरदाह (१९८६), अस्वस्थ विस्तीर्ण रात्र (१९९०), अनर्थ (१९९८),आयुष्याची छोटी गोष्ट (२०००) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्‍ध झाले. दूर तेथे दूर तेव्हा आणि सर्प ह्या दोन लघुकादंबऱ्यांचा संग्रह (२०००) व दोन मित्र (२००४) ही त्यांची कादंबरी प्रसिद्घ आहे, तसेच मरणरंग, नैनं दहति पावकः, आतंक ही त्यांची नाटके १९९९ मध्ये प्रसिद्घ झाली  हाेती. त्यांनी जंगलातील दूरचा प्रवास (१९९८) ही बालकादंबरी आणि चल रे भोपळ्या आणि हंडाभर मोहरा (२००१) ही बालनाटके लिहिली. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत.

हेही वाचलं का? 

SCROLL FOR NEXT