Latest

कराचीत शिक्षक ते भारताचे उपतंप्रधान…जाणून घ्‍या लालकृष्‍ण अडवाणींचा राजकीय प्रवास

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : "हिंदुस्‍तानची फाळणी करणे ही ब्रिटिशांची चूक होती. तर आणीबाणी स्‍वदेशी सत्ताधार्‍यांची चकू आहे," असे तत्‍कालिन सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्‍या नेतृत्त्‍वाला ठणकविणारे नेते. "राष्‍ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि स्‍व: सर्वात अखेर," हे तत्त्‍व पाळत राजकारणात आपल्‍या राजकीय महत्त्‍वाकांक्षेपेक्षा देशहित आणि पक्ष शिस्‍तीला प्राधान्‍य देणारे ज्‍येष्‍ठ नेते, अशी भाजपचे सहसंस्‍थापक लालकृष्‍ण अडवाणी यांची देशभरात ओळख आहे. ९० च्‍या दशकात अयोध्‍येतील राम मंदिरासाठी त्‍यांनी काढलेली रथयात्रा हा जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. योगायोग असा की, २२ जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण झालं आणि त्‍यानंतर काही दिवसातच देशातील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍काराने त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात येणार असल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. (Bharat ranta to Lalkrishna Advani know about his political journey ) जाणून घेवूया लालकृष्‍ण अडवाणी यांच्‍या राजकीय जीवनातील ठळक घटनांविषयी…

कराचीत जन्‍म

अडवाणी यांचा जन्‍म पाकिस्‍तानमधील कराची येथे ८ नोव्‍हेंबर १९२७ रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. त्‍यांचे वडील किशनचंद अडवाणी हे उद्योजक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराचीतील सेंट पॅट्रिक हायस्कूलमध्‍ये झाले. यानंतर त्यांनी डीजी नॅशनल स्कूल, हैदराबाद, सिंधमध्ये प्रवेश घेतला. कराचीतील मॉडल हायस्‍कूलमध्‍ये त्‍यांनी शिक्षक म्‍हणूनही काम केले.

Lalkrishna advani : तारुण्‍यात फाळणीची झळ

ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली. अडवाणी कुटुंब पाकिस्‍तान सोडून मुंबईत आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून लालकृष्‍ण अडवाणी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सचिव झाले. त्‍यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. १९७० मध्‍ये राज्‍यसभेचे खासदार झाले.

भाजपचे सर्वाधिक काळ अध्‍यक्षपद भूषवलेले नेते

१९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. पक्षाच्‍या स्‍थापनेपासून देशभरात पक्ष रुजविण्‍यात त्‍यांचे अमूल्‍य योगदान आहे. यानंतर त्‍यांनी राजस्‍थानमध्‍ये संघाच्‍या प्रचारक कार्यात अनेक वर्ष आपले योगदान दिले. भाजपच्‍या पायाभरणी करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. १९८० मध्‍ये भाजपला लोकसभेच्‍या दोन जागांवर विजय मिळवला. यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्‍याबरोबर १९८० ते ९० या दहा वर्षांमध्‍ये भाजपला राष्‍ट्रीय पातळीवरील पक्ष म्‍हणून ओळख निर्माण करण्‍या त्‍यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्‍यामुळेच २ जागांवरुन भाजपने पुढील निवडणुकीत ८६ जागा मिळाल्‍या. तर १९९२ मध्‍ये १२१ आणि १९९६ मध्‍ये १६१ जागांपर्यंत भाजपने झेप घेतली. काँग्रेसनंतर भाजप हा सर्वाधिक खासदार असणारा पक्ष ठरला. १९८६ ते १९९०, १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या कालावधीत त्‍यांनी भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्षपद भूषवले.

राजकीय यात्रा आणि अडवाणी

विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी चळवळ सुरू केली. दुसरीकडे ९० च्‍या दशकामध्‍ये अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजप राममंदिर आंदोलनाचा चेहरा बनला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 25 सप्टेंबर 1990 रोजी अडवाणींनी सोमनाथ येथून राम रथयात्रेला सुरुवात केली होती. लालकृष्‍ण अडवाणी यांनी आपल्‍या राजकीय जीवनात अनेक रथयात्रा काढल्‍या. यामध्‍ये 'जनदेश यात्रा', 'सुवर्ण जयंती रथयात्रा', 'भारत उदय यात्रा' आणि 'भारत सुरक्षा यात्रा' आणि 'जनचेतना यात्रा' आदींचा समावेश आहे.

चॉकलेट, चित्रपट आणि क्रिकेटचे चाहते

लालकृष्‍ण अडवाणी राजकारणात रमले असले तरी त्‍यांना चॉकलेट, हिंदी चित्रपट आणि क्रिकेट याची विलक्षण आवड आहे. विशेष म्‍हणजे ते चित्रपट समीक्षकही राहिले आहेत.

Lalkrishna advani : वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान

लालकृष्ण अडवाणी यांनी २००२ ते २००४ दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. याआधी ते १९९८ ते २००४ दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सरकारमध्‍ये केंद्रीय गृहमंत्री होते. 10व्या आणि 14व्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले. २०१५ मध्ये त्यांना देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले होते. त्‍यांनी आपला जीवन प्रवास माय कंट्री, माय लाइफ नावाचे पुस्तकाच्‍या माध्‍यमातून सर्वांसमोर मांडला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT