Latest

Rajasthan CM Oath Ceremony | राजस्थानात ‘भजन’ राज! १४ वे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांनी घेतली शपथ, पीएम मोदींची उपस्थिती

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भाजप विधिमंडळ पक्षाचे नेतेपदी निवड झालेले सांगानेरचे आमदार भजनलाल शर्मा यांनी आज (दि. १५ डिसेंबर) राजस्थानचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

संबंधित बातम्या 

जयपूरमधील अल्बर्ट हॉलच्या बाहेर आज दुपारी १ वाजता हा शपथविधी सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या सोहळ्याला उपस्थित आहेत. तसेच भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी या सोहळ्याला हजर होते. व्यासपीठावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचीही उपस्थिती होती.

आज शपथविधी सोहळ्यापूर्वी बोलताना भजनलाल शर्मा यांनी म्हटले होते की, मी संत आणि गुरुजींचे आशीर्वाद घेतले. आम्ही पंतप्रधान मोदी यांची गारंटी राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवू. शर्मा यांनी शपथविधीपूर्वी सरल बिहारी मंदिरात संत मृदुलकृष्ण शास्त्री यांची भेट घेतली. आज शपथविधी सोहळ्याच्या दिवशी भजनलाल यांचाही वाढदिवस आहे. त्यांनी शपथविधी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आई-वडिलांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले.

भजनलाल शर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वडील किशन स्वरूप शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. "मी आनंदी आहे, 'भगवान की लीला है'…" अशा शब्दांत किशन स्वरूप शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

३३ वर्षांनंतर ब्राह्मण समाजातील व्यक्तीकडे मुख्यमंत्रीपद

राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांच्या रुपाने तब्बल ३३ वर्षांनंतर भाजपने ब्राह्मण समाजातील व्यक्तीकडे मुख्यमंत्रीपदी जबाबदारी दिली आहे. शर्मा गेल्या ३५ वर्षांपासून राजकारणात आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११५ जागा जिंकून बहुमत मिळवले. तर काँग्रेसला ६९ जागांवर समाधान मानावे लागले. राजस्थानमध्ये भाजपचा चेहरा मानल्या जाणाऱ्या वसुंधरा राजे यांना डावलत भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान केले आहे.

भजनलाल शर्मा : सरपंच ते मुख्यमंत्री

भजनलाल शर्मा हे ५५ वर्षांचे आहेत. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शर्मा हे मूळचे भरतपूर येथील अटारी गावचे रहिवासी आहेत. त्यांना भाजपने प्रथमच जयपूर जिल्ह्यातील सांगानेर विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. जिथून ते जिंकून आमदार झाले. भजनलाल शर्मा यांच्या वडिलांचे नाव किशन स्वरूप शर्मा आहे. ३४ वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. तसेच ते शेती आणि खनिज पुरवठा व्यवसायाशी जोडले आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नदबाई येथे झाले. याच काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडले गेले आणि हाच राजकारणात प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग बनला. १९९२ मध्ये श्रीराम जन्मभूमी आंदोलनादरम्यान ते तुरुंगातही गेले होते. त्यांच्याकडे १९९१-९२ मध्ये भाजप युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अनेक पदांची जबाबदारी सांभाळली. वयाच्या २७ व्या वर्षी ते पहिल्यांदा सरपंच झाले आणि त्यानंतर सलग दोन वेळा सरपंच राहिले. एकदा ते पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही निवडून आले होते. ते दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT