Latest

अरविंद केजरीवालांची भगवंत मान यांनी घेतली भेट; पाया पडून मागितला आशीर्वाद

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली; पुढारी वृत्‍तसेवा : पंजाबमधील सर्व दावे धुडकावून लावत आम आदमी पक्षाने संपूर्ण राज्यात आपला झाडू चालवला. राज्यात विक्रमी ९२ जागा जिंकलेला आम आदमी पक्ष सरकार स्थापन करणार आहे. सरदार भगतसिंग यांच्या गावात 16 मार्च रोजी भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. 13 मार्च रोजी मान अमृतसरमध्ये रोड शोही काढणार आहेत. याआधी आज (शुक्रवार) विजयानंतर भगवंत मान यांनी केजरीवाल यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टी पहिल्यांदाच सरकार स्थापन करणार आहे. 1970 नंतर पहिल्यांदाच बाहेरचा पक्ष येथे सरकार स्थापन करेल. भगवंत मान 16 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पक्षाने विशेष तयारी केली आहे. शहीद आझम भगतसिंग यांचे गाव धरती खटकड़ कलां ला शपथविधी सोहळ्यासाठी खास सजवले जात असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे.

यावेळी अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे कार्यकर्ते आतापासून या कार्यक्रमाबाबत अत्यंत गंभीर असून भव्य कार्यक्रमाची तयारी करत आहेत. तत्पूर्वी, मान 13 मार्च रोजी अमृतसरमध्ये रोड शो करतील आणि ऐतिहासिक विजयासाठी जनतेला अभिवादन करतील.

केजरीवाल यांच्या पायाला स्‍पर्श करून मागितला आशिर्वाद… 

पंजाबमध्ये बहुमत मिळाल्यानंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षात उत्साह आहे. मतमोजणीनंतर दुसऱ्याच दिवशी मान यांनी पक्षाचे सुप्रीमो आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंजाबला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या दोघांनीही मान यांची भेट घेतली आणि त्यांच्या शानदार विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी भगवंत मान यांनी केजरीवाल यांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी केजरीवाल यांनी मान यांची गळाभेट घेतली.

SCROLL FOR NEXT