Latest

सावधान ! परप्रांतीय नोकर ठरताहेत धोकादायक

अमृता चौगुले

पिंपरी : मालकाचे हातपाय बांधून नोकराने घरातील सोन्याच्या दागिन्यांसह 23 लाख 60 हजारांचा किमती ऐवज लुटून नेला. ही घटना चिखली परिसरात नुकतीच उघडकीस आली. यापूर्वीदेखील नोकराने घरात चोरी करून पळ काढल्याच्या घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडल्या आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने परप्रांतीय नोकरांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे कोणतीही खातरजमा न करता परप्रांतीय नोकर कामावर ठेवणे धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

हाताला काम देणारी नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात राज्यासह देशाभरातून कामगार येत असतात. काहीजण एमआयडीसी पट्ट्यात राहून रोजंदारीवर आपले पोट भरतात. तर, काहीजण कोणाच्या तरी तोंड ओळखीवर आलिशान बंगल्यांमध्ये नोकर म्हणून कामास राहतात. निगडी प्राधिकरण येथील उच्चभ्रू वस्त्यांसह शहरातील सोसायट्यांमध्ये घरगडी अर्थात नोकर ठेवण्याचे फॅड आहे. घरातील स्वयंपाकापासून ते झाडलोट करून घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी या नोकरांवर दिली जाते.

नवरा-बायको दोघेही नोकर म्हणून राहणार असल्यास वर्षाचे चांगले पॅकेज ठरवून दिले जाते. यामध्ये त्यांचा खानपानाचा खर्च मालकावरच असतो.याव्यतिरिक्त काही छोट्या घरांमध्ये एकच पुरुष नोकर ठेवला जातो; मात्र अलीकडे परप्रांतीय नोकर घरमालकाला लुटून पळ काढत असल्याचे काही घटनांमधून समोर आले आहे. त्यामुळे नोकर ठेवण्यापूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

घटना क्र. 1 – गुन्ह्यासाठी वापरली तब्बल 89 सिमकार्ड

घरमालकाच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून गीता (30) आणि महेश (40, पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) या नोकर दाम्पत्याने घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा सव्वातीन लाखांचा ऐवज लुटून नेला. 11 जून रोजी महेशनगर, पिंपरी येथे हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिस तपासात या जोडीने गुन्ह्यासाठी तब्बल 89 सिमकार्ड वापरले असून, त्यासाठी दिलेली सर्व कागदपत्रेदेखील बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही जोडगोळी सराईत असून त्यांनी 'मायक्रो प्लानिंग' केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

घटना क्र. 2 – मालकिणीला दाखवला कोयत्याचा धाक

दूध पिशवी देण्याच्या बहाण्याने नोकर आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी मालकिणीच्या घरात प्रवेश केला. आरोपींनी मालकीण आणि घरातील सदस्यांना कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण दोन लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दोन वर्षांपूर्वी पहाटे साडेपाच वाजता यमुनानगर, निगडी येथील जीवनधारा हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली होती.

घटना क्र. 3 – सोन्याच्या बिस्किटांवर डल्ला

नोकराने कपाटातील 6 लाख 25 हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे चोरून नेली. ही घटना पिंपरी येथे उघडकीस आली. या प्रकरणी नारायण रिजूमल सुखेजा (56, रा. शिवसागर, साधू वासवानी गार्डन जवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवी नाथ (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नेपाळ) या नोकराच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

कमी पगारात कामाची तयारी

परप्रांतातून आलेल्या कामगारांची शहरात राहण्याची सोय नसते. त्यामुळे खाऊन- पिऊन तसेच राहण्याची सोय असल्यास काम देणार्‍या संबंधितांकडे त्यांचा ओढा असतो. अशा प्रकारे काम मिळत असल्यास ते जास्त पगारासाठी आग्रह किंवा अडून बसत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रीय नोकरांच्या तुलनेत परप्रांतीय नोकरांचा पगार कमी असल्याचे पाहावयास मिळते. कमी पगारात नोकर उपलब्ध होत असल्याने परप्रांतीय नोकरांची मागणी वाढू लागली आहे.

महाराष्ट्रीय नोकरांचा वेगळाच फंडा

गावाकडं शेतात नांगर हाकताना भावाला सोन्याचा हंडा सापडलाय, मला यातलं काहीच कळत नाय, तुम्ही फक्त पाच लाख घेऊन चला, अन् सगळंच सोनं घेऊन या, अशी बतावणी करून महाराष्ट्रीय नोकर मालकाला लुटत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. या गुन्ह्यामध्ये मालकाला हंडा सापडलेल्या शेतात नेण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेले जाते. त्यानंतर दबा धरून बसलेले साथीदार मालकाची यथेच्छ धुलाई करून पैसे काढून घेतात. परप्रांतीय नोकरांपेक्षा वेगळा असलेला हा फंडादेखील अनेकांची डोकेदुखी ठरला आहे.

कारवाईकडे दुर्लक्ष

कंपन्यांतील कामगारांप्रमाणेच घरातील नोकरांच्यादेखील कोणत्याच नोंदी ठेवल्या जात नाहीत. ज्यामुळे गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बहुतांश सराईत गुन्हेगार मोबाईलही वापरत नाहीत. त्यामुळे तांत्रिक तपासालादेखील मर्यादा येतात. अशा गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून घरमालकावर कारवाई झाल्याच्या नोंदी दुर्मिळ आहेत.

घरामध्ये नोकर ठेवण्यापूर्वी पोलिस पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच, ज्याच्या ओळखीवर आपण नोकर ठेवणार आहोत, त्याचीदेखील इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे. तसेच, नोकराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, मूळ गावाचा पत्ता, ओळखीच्या नातेवाईक, मित्रांचा पत्ता घेणे गरजेचे आहे.

– सतीश माने, सहायक आयुक्त,
पिंपरी-चिंचवड

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT