Latest

आयपीएलमधील बेटिंगमुळे कंगाल झालेला बिटेक इंजिनिअर बनला चोर!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवरील बेटिंगमुळे कंगाल झालेला हरियाणा येथील बिटेक इंजिअर चोर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्याने पुण्यात विमानाने येऊन ही चोरी केल्याचा प्रकार बिबवेवाडी पोलिसांनी उघड केला आहे. त्याला त्याच्या हरियाणा येथील राहत्या घरातून बेड्या ठोकल्या. ट्विन्कल अर्जुन अरोरा ( 30, बलभगड, जि. फरीदाबाद, हरियाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका प्रतिष्ठित व्यक्तीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याची माहिती परिमंडळ 5 च्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी सांगितले, १५ मे रोजी बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत यातील फिर्यादी हे क्रिकेट टुर्नामेंट मधील मॅच खेळण्यासाठी राजयोग लॉन्स येथे त्याची कार सुझुकी सियाज हि घेवून आले होते. कार पार्क करून ते दरवाजा लॉक न करता क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान त्याचे गाडीतून सॅमसंग कंपनीचा टॅब, अॅक्सीस बँकेंचे दोन डेबीट कार्ड अज्ञात चोरट्याने चोरले होते. त्याने चोरलेल्या एका डेबीट कार्डव्दारे १ लाख काढले व दुसऱ्या कार्ड व्दारे २ लाख ९९ हजार २०० रुपयांची खरेदी केली होती. यानंतर फिर्यादींनी पोलिसात धाव घेतली होती.

असा काढला आरोपीचा माग

गुन्हा दाखल झाल्या नंतर बिबवेवाडी पोलीसांच्या तपासपथकाने तपास सुरू केला. फिर्यादींच्या बँक खात्याच्या डिटेल्सवरून आरोपीने पुणे कॅम्प परिसरातून दोन महागडे मोबाईल खरेदी केल्याचे व फिर्यादी यांचे एटीएम कार्डवरून बदरपुर हरियाणा येथे पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे समजल्याने आरोपी हा विमानाने गेला असल्याचा संशय पोलिसांना आला. लोहगांव विमानतळावर जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहून व आरोपीचे तिकीट बुकींगवरून त्याचे नाव व पत्ता टि्वन्कल अरोरा असल्याचे व तो मूळचा हरियाणा येथील असल्याचे समजले.

…अन् बिबवेवाडी पोलिस पोहचले हरियाणात

तांत्रिक विश्लेषणात पोलिसांना अरोराचा मोबाईल नंबर मिळाला. त्यावरून तपास पथकाचे अधिकारी प्रविण काळुखे व अमंलदार यांची टिम तयार करून त्यांना हरियाणा येथे पाठवण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे हे पथक आरोपीच्या राहत्या घरी पोहचले. त्याला लागलीच ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याला तेथील स्थानिक न्यायालयात हजर केले व त्याची प्रवासी कोठडी घेतली. त्याला घेऊन पोलिस पुण्यात पोहचले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, अमंलदार शामराव लोहमकर, तानाजी सागर ,संतोष जाधव, शिवाजी येवले व राहुल शेलार यांच्या पथकाने केली. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक, प्रविण काळुखे हे करीत आहेत.

कर्जात बुडाला अन लागला चोरी करायला

पोलिसांनी आरोरा याला ताब्यात घेतल्यानंतर तो हरियाणातील एका नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करत होता. परंतु तो क्रिकेट प्रेमी होता. याचा क्रिकेट प्रेमाच्या वेडातून तो आयपीएल सामन्यावर बेटिंग खेळू लागला. याच बेटिंग मधून त्याला लाखो रुपयांचे कर्ज झाले. अन त्याने चोरीचा मार्ग स्वीकारला. त्याच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. तर त्याची मोठी बहीण पीएचडी करते आहे.

आरोराला पश्चात्ताप :

आरोपी झालेल्या कर्जामुळे चोरीच्या मार्गाला लागला. त्याच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर त्याला केलेल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप झाला. त्याला जेव्हा पोलिस ठाण्यात आणले तेव्हा त्याला आश्रू अनावर झाले होते.

आरोरा याच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले होते. तो क्रिकेट स्कोर नावाच्या संकेतस्थळावर भारतात जेथे जेथे क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या टूरनामेंट होतात तेथील माहिती आरोरा घ्यायचा. या ठिकाणी तो हरियाणा येथून विमानाने पोहचायचा तिथे खेळाडूंनी मोबाईल आणि क्रेडिट कार्ड तो चोरत होता. चोरलेल्या मोबाईल मधील सिमकार्ड काढून तो आपल्या मोबाईल मध्ये टाकायचा. त्या आधारे फॉरगॉट पासवर्डच्या माध्यमातून खात्याची गोपनीय माहिती मिळवून तो पैसे काढत होता. तसेच विविध वस्तूंची खरेदी करत होता.

                                         – विलास सोंडे, वरिष्ठ निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस ठाणे.

आरोपीची गुन्हा करण्याची पद्धती बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने अगदी चांगल्या पद्धतीने उघड केली आहे. त्याने यापूर्वी विमानाने येऊन भुगाव येथेही असा प्रकार केल्याची माहिती आहे. तसेच त्याने चंदीगडसह इतर ठिकाणी त्याने गुन्हा केला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या होणार्या फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे आहे.

                                                   – नम्रता पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ 5.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT