Latest

बीड : सराफाला लुटण्याचा प्रयत्‍न; तीन चोरट्यांना अटक, दोन जण फरार

निलेश पोतदार

गेवराई ; पुढारी वृत्तसेवा गेवराई येथुन गावखेड्यात व्यवसायासाठी दुचाकीवरुन चाललेल्या सराफाच्या समोर मोटार कार आडवी लावत चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह सोने-चांदीच्या दागिन्यांची लूट करण्यात आली. लाखो रुपयांचा ऐवज घेऊन जाणा-या तीन चोरटय़ांना तलवाडा पोलीसांनी अवघ्या एक तासात मनूबाई जवळा शिवारात पकडून गजाआड केले. दरम्‍यान दोन चोरटे फरार झाले. सदरील लुटीची घटना आज (मंगळवार) सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान गेवराई-सेलू रस्त्यावरील हिवरा फाटा येथे घडली.

गेवराई येथील सराफ पांडुरंग जगन्नाथ महामुनी हे मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन केकत पांगरी या गावात व्यवसायासाठी जात होते. हिवरा फाटा नजीक अचानक स्कॉर्पिओ मोटारीतून चार ते पाचजण उतरुन दुचाकीला आडवे होऊन सराफ महामुनी यांना चाकुचा धाक दाखवत त्‍यांच्या जवळील सोने-चांदी तसेच काही रक्‍कमेसह लाखोचा ऐवज लुटला. हा प्रकार दुचाकीवरुन गेवराई-सेलू या रस्त्यावरून केकत पांगरीला जात असताना हिवरा फाटा येथे घडला.

या घटनेची माहिती संबधीत सराफाने गेवराई-तलवाडा पोलीसांना दिली. यानंतर तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, गेवराई पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, सहायक पोलीस निरीक्षक दिपक लंके यांनी तीन चोरट्यांच्या मनूबाई जवळा शिवारात अवघ्या एक तासात मुसक्या आवळल्या. शिवदत्त रामराव सोंळंखे (रा गेवराई), रामचंद्र रंगानाथ गांगूर्डे (रा अंबड), नितीन जोगदंड (रा नागझरी) या तिघांना तलवाडा पोलीसांनी ताब्यात घेतले. अन्य एक जण फरार झाल्याची माहिती तलवाडा पोलीसांनी दिली. लुटीची घटना गेवराई पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने तलवाडा पोलीसांनी चोरट्यांची रवानगी गेवराई पोलिस ठाणे येथे करण्यात आली असून, चार जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT