Latest

चंद्रपूर : मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीवर अस्वलाचा हल्ला !

सोनाली जाधव

चंद्रपूर;  पुढारी वृत्तसेवा: मॉर्निंग वाकला गेलेल्या एकावर पिल्लासह असलेल्या एका अस्वलाने हल्ला केला. यात ती व्यक्ती जखमी झाली आहे. ही घटना सिंदेवाही शहराजवळील रेल्वेस्टेशन-जिटीसी रोड परिसरात  आज ( दि. १५ ) सकाळी सहाच्या सुमारास घडली (Bear attack). नंदू सिताराम शेंडे (५०)असे अस्वलाचा हल्ल्‍यात जखमी झालेल्‍या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, आज सकाळी नेहमी प्रमाणे नंदू शेंडे मॉर्निंग वाॅकला गेले होते. सिंदेवाही शहराजवळील रेल्वे स्टेशन-जीटीसी रोड परिसरात अचानक त्यांच्या समोर अस्वल आले. त्याने शेंडेवर हल्ला केला.  त्यांच्या डोळे, नाक आणि डाव्या कुशीत गंभीर दुखापत झाली आहे. त्‍यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्राथमिक उपचाराकरीता हलविण्यात आले.  पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी शसालकर यांच्या नेतृत्वात वनविभाग करीत आहे.

 Bear attack : वारंवार जंगली श्वापदांचे दर्शन 

सिंदेवाही रेल्वे स्थानकापासूनच झुडपी जंगल सुरू होत असल्याने जिटीसी (ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर) ते शासकीय आयटीआय पर्यंत असणार्‍या लोकवस्तीत अनेकदा नागरिकांना जंगली श्वापदांचे दर्शन होते. पट्टेदार वाघ, बिबट, रानडुक्कर इ. अनेक प्राण्यांचा या भागात नियमित वावर आहे; परंतू आज प्रथमच अस्वलाने पिल्ल्यासह दर्शन देऊन अचानक हल्ला चढवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिंदेवाहीकर मोठ्या संख्येने नियमित सकाळ सायंकाळी फिरायला जातात. जवळच शासकीय आयटीआय व आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह असल्याने विद्यार्थ्यांची दिवसभर ये-जा असते. लोनवाही-गडमौशी परिसरातील महिलाही सरपण गोळा करण्यासाठी या भागात फिरत असतात. एकूणच कच्चेपार, गुंजेवाही-पवनपार आणि पाथरी कडे येणा-जाणार्‍यांचा हा प्रमुख रस्ता आहे. वनविभागाने तातडीने पिल्लासह असलेल्या अस्वलाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिकांकडून केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT