पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या आयसीसी (ICC) महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची खराब कामगिरी कायम आहे. बांगलादेशविरुद्ध सोमवारी (दि. १४) झालेल्या सामन्यात त्यांना ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ७ गड्यांच्या मोबदल्यात २३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात २२५ धावाच करू शकला. पाकचा हा सलग चौथा पराभव असून आता ते स्पर्धेतून जवळपास बाहेर पडले आहेत. या विजयासह बांगलादेश महिला संघाने इतिहास रचला आहे. विश्वचषक स्पर्धेतील हा संघाचा पहिला विजय आहे. बांगलादेशच्या फहिमा खातून हिला तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
तत्पूर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. शमीमा सुलताना १७ धावा करून बाद झाली. शर्मीन अख्तरने ४४ धावांचे योगदान दिले. फरजाना हक आणि कर्णधार निगार सुलताना यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सुलताना ४६ धावांवर बाद झाली. त्यानंतर फरझानाने चांगली फलंदाजी सुरूच ठेवली. ती ७१ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतली. खालच्या फळीतील इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. अशा प्रकारे बांगलादेशने ५० षटकांत ७ गडी गमावून २३४ धावा केल्या. पाकिस्तानकडून नशरा संधूने ३ बळी घेतले.
२३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. निदा खान आणि सिद्रा अमीन या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. निदा ४३ धावा करून बाद झाली. सिद्राने कर्णधार बिस्माह मारूफसह दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. बिस्माह ३१ धावा करून जहांआरा आलमची शिकार ठरली. दरम्यान, सिद्राने आधी आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर शतकही झळकावण्यात यश मिळवले. १०४ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर ती धावबाद झाली. मधल्या फळीत एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टीकाव धरता आला नाही. त्यांच्या एकापाठोपाठ विकेट पडत गेल्या. अशाप्रकारे संपूर्ण षटके खेळताना पाकिस्तानचा संघ ९ विकेट गमावून २२५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. बांगलादेशकडून फहिमा खातूनने ३८ धावांत ३ बळी घेतले. या स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सलग चौथा पराभव आहे.