Latest

मुंबईत ड्रोन, एअरक्राफ्ट, खासगी हॅलिकॅप्टर, पॅराग्लायडर यांना बंदी

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : दहशतवाद्यांच्या कायम टार्गेटवर असलेल्या मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, हॉट एअर बलुन्स, खासगी हॅलिकॅप्टर, पॅराग्लायडर, हॅग ग्लायडर्स, पॅरा मोटर्स यांच्या उड्डाणाना बंदी घालण्यात आली आहे. १८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या काळात हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. अतिरेकी, देशविरोधी आणि विघातक शक्ती मुंबईवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाईट एअरक्राफ्ट किंवा पॅराग्लायडरचा वापर करण्याची दाट शक्यता आहे. तसेच, गुप्तचर यंत्रणाकडूनही मुंबईला वेळोवेळी अलर्ट दिले जातात. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेत वरील आदेश जारी केले आहेत.

मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी वरील सर्व प्रकारच्या उड्डाण क्रियांना मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंध करण्याचे आदेश काढले आहेत. यातून पोलीसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त अभियान यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणाऱ्या कारवाईना यात सूट देण्यात आली आहे. तर, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुंबईत जमावबंदी

मुंबईत शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याच्या शक्यतेतून पोलिसांनी ३० ऑगस्टपर्यंत शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मुंबई पोलिसांच्या अभियान शाखेचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले आहेत. मुंबईत शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता असून मानवी जीवन व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींना बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यात पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनासोबतच मिरवणूकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बॅड वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT