Nagpur Rain Update: विदर्भात पावसाचा जोर वाढणार: शेतकरी, नागद्वार यात्रेकरू सुखावले | पुढारी

Nagpur Rain Update: विदर्भात पावसाचा जोर वाढणार: शेतकरी, नागद्वार यात्रेकरू सुखावले

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, मराठवडयासह मध्य भारतात पावसाचा (Nagpur Rain Update)जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. नागपुरात बऱ्याच दिवसांनी गुरूवारी रात्रभर पावसाने हजेरी लावली. आज काहीशी उघडीप असली तरी रिमझिम श्रावनसरी मनाला चिंब करत आहेत. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये शनिवारपासून (दि.19) मुसळधार पाऊस होणार असल्याने उकाड्याने बेजार नागपूरकर आणि राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर पुनरागमन केले आहे. गुरुवारपासून मुंबईसह कोकणातील काही भागांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात पुढील 48 तासांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा नागपंचमीच्या तोंडावर वरुणराजा (Nagpur Rain Update) बरसणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

गेल्या आठवड्यात मध्यप्रदेशातील पंचमढी येथील नागद्वार यात्रा सुरू झाली. मात्र, पाऊस नसल्याने यात्रेवर चिंतेचे सावट होते. आता पावसाच्या हजेरीने भाविकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. नागपुरातून हजारो वैदर्भीय भाविक या यात्रेसाठी एसटी, रेल्वे, मध्यप्रदेश परिवहन आणि खासगी वाहनांनी जातात. एसटी महामंडळाच्या अनेक गाड्याचे देखील रोजचे बुकिंग झाले आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात नागपूरसह काही भागांमध्ये गुरुवार पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडली होती. परंतु, आता पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा 

Back to top button