Latest

‘बीएएमएस’ पदोन्नतीपासून वंचितच !!

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील गट 'ब' संवर्गातील जवळपास 850 'बीएएमएस' अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी गेल्या 25 वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. एमबीबीएस दर्जाच्या अधिकार्‍यांचे काम करणार्‍या या 'बीएएमएस' अधिकार्‍यांना अद्यापही पदोन्नतीपासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे डॉक्टरांनी असंतोष व्यक्त केला. भोर, वेल्हा, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, खेडसह पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील आदिवासी, अतिदुर्गम डोंगराळ भागात 'बीएएमएस' डॉक्टर सेवा देत आहेत. यापैकी काही भागांत रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा नसतानाही 'बीएएमएस' डॉक्टर अशा दुर्गम भागात सेवा देत आहेत. परंतु, आजपर्यंत हे डॉक्टर 'अ' वर्गात प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य विभागाने एमबीबीएस वैद्यकीय अधिकार्‍यांप्रमाणे 'बीएएमएस' अधिकार्‍यांनाही गट 'अ'मध्ये पदोन्नती देणे अपेक्षित होते. मात्र, एकाही गट 'ब'मधील अधिकार्‍याला पदोन्नती मिळाली नाही. ते गट 'ब'मधूनच सेवानिवृत्त होत आहेत. कोरोना काळात कोरोनायोद्धा म्हणून सत्कारापलीकडे या अधिकार्‍यांना कोणताही सन्मान शासनाने दिला नाही. त्यामुळे राज्यभरातील वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे.

संबंधित बातम्या : 

शासनास स्थायी स्वरूपात गट 'अ' वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने कंत्राटी स्वरूपात भरण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. ज्यामुळे वैद्यकीय अधिकारी गट 'ब' यांच्यावर अन्याय होत आहे. जर गट 'अ' संवर्गात 'ब' गटातील वैद्यकीय अधिकार्‍यांना पदोन्नतीची संधी दिल्यास शासनास प्रशिक्षित व स्थायी स्वरूपात कायम वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होतील आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल, असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाचे सचिव डॉ. विनोद स्वामी, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार पवार, डॉ. दत्तात्रय धोत्रे, डॉ. अजय पायघन, डॉ. गजेंद्र बावस्कर, डॉ. अर्चना दरेकर, डॉ. विद्यानंद खटके यांनी सांगितले.
राज्यातील दुर्गम भागात 'बीएएमएस' डॉक्टर वर्षानुवर्षे सेवा देत आहेत. यापैकी काहींना 20 ते 25 वर्षे झाल्यावरही पदोन्नती मिळाली नाही. शासनाने या डॉक्टरांना तातडीने पदोन्नती देण्याची गरज आहे. असे केल्यास दुर्गम भागातही तरुण डॉक्टर सेवा द्यायला तयार होतील. पदोन्नतीच्या मागणीसाठी आम्ही शासनाकडे निवेदन पाठविले आहे. डॉ. अरुण कोळी, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघ

'शासनाच्या आरोग्य विभागात गेल्या 17-18 वर्षांपासून आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी आदिवासी, अतिदुर्गम डोंगराळ भागांत अतिशय प्रामाणिकपणे तळागाळातील गरजू रुग्णांना आरोग्यसेवा देत आहोत. या सर्व गोष्टींचा विचार शासनाने गांभीर्याने करायला हवा व गेल्या 23 वर्षांपासून रखडलेल्या वैद्यकीय अधिकारी गट 'ब' यांच्या पदोन्नतीचा प्रश्न सोडवून सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांना न्याय द्यावा.'

                                                   डॉ. दत्तात्रय धोत्रे, वैद्यकीय अधिकारी

SCROLL FOR NEXT