पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात सुरू असलेल्या वन-डे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने 9 सामन्यात 4 सामन्यात विजय मिळवला. तर, 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या निराशाजनक कामिगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये गोंधळ सुरू आहे. संघाचा नियमित कर्णधार बाबर आझम स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने शाहीन शाह आफ्रिदीकडे टी-20 आणि शान मसूदकडे कसोटीचे कर्णधारपद सोपवले आहे. त्याचबरोबर वनडे संघाच्या कर्णधाराबद्दल अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Babar Azam)
वन-डे वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमला कर्णधारपद सोडावे लागेल, अशा चर्चा सुरू होत्या. या चर्चेतूनच पाकिस्तनाचा नवीन कर्णधार म्हणून शाहीन आफ्रिदीचे नाव पुढे येत होते. या वन-डे वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करणारा शाहीन हा एकमेव पाकिस्तानी खेळाडू होता. त्याने यापूर्वी पीएसएलमध्ये लाहोर कलंदर संघाचे नेतृत्व केले आहे. यासह त्याने पीएसमध्ये आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले होते. यामुळे त्याला टी-20 कर्णधार बनवणे हा योग्य निर्णय असल्याचे मानले जात आहे. शाहीन आफ्रिदीसह मोहम्मद रिझवानही कर्णधारपदाच्या शर्यतीत सामील होता, मात्र त्याला ही जबाबदारी देण्यात आलेली नाही. (Babar Azam)
पाकिस्तानचा नवा कसोटी कर्णधार शान मसूद याचे नाव चर्चेत नव्हते, मात्र त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. 34 वर्षीय मसूद हा डावखुरा फलंदाज असून त्याने पाकिस्तानसाठी 30 कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने २८ च्या सरासरीने १५९७ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याचे कसोटी संघातील स्थान निश्चित झाले नव्हते, मात्र त्याच्याकडे अचानक संघाची कमान देण्यात आली आहे. आता त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कशी कामगिरी करतो हे महत्वाचे आहे.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेहमीच राजकारणाचे वर्चस्व राहिले आहे. अशा परिस्थितीत शाहीन आफ्रिदी कर्णधार बनल्यानंतर संघात इतरही अनेक बदल होऊ शकतात. पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफ आणि निवड समितीमध्ये बदल होणार हे नक्की मानले जात आहे.
पाकिस्तानचा पुढचा वनडे सामना 2024 मध्ये नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. यामध्ये अजून एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. या कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे कर्णधाराची निवड केलेली नाही.
हेही वाचा :