Latest

Australia T20 Tournament : भारतीय कर्णधार जखमी, ‘या’ मोठ्या स्पर्धेतून बाहेर

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Australia T20 Tournament : भारतीय महिला संघाला 7 व्यांदा आशिया कप विजेतेपद मिळवून देणाऱ्या हरमनप्रीत कौरला मोठा धक्का बसला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे ती बिग बॅश लीगच्या (BBL) 8व्या हंगामातून बाहेर पडली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भारतीय महिला संघाची कर्णधार असणा-या हरमनप्रीतच्या दुखापतीचा थेट फटका मेलबर्न रेनेगेड्स संघाला बसला आहे. गेल्या मोसमात तिने चमकदार कामगिरी केली होती आणि 12 डावात 41.4 च्या सरासरीने 406 धावा फटकावल्या होत्या. तिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरविण्यात आले होते.

हरमनप्रीत कौर गतवर्षी टूर्नामेंटची सर्वोत्तम खेळाडू ठरली होती

मेलबर्न रेनेगेड्सचे सरव्यवस्थापक जेम्स रोसेनगार्टेन म्हणाले, "आम्हाला आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू गमावावा लागला हे आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे. तिच्या जागी इंग्लंडची फलंदाज इव्ह जोन्सची निवड करण्यात आली आहे. गेल्या मोसमात हरमनप्रीत कौरने मेलबर्न रेनेगेड्स संघासाठी चांगली कामगिरी केली होती. आम्हाला या वेळीही अशीच अपेक्षा होती. पण दुर्दैवाने तिला दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले आहे. इव्ह जोन्स सध्यातरी पुढील दोन सामन्यांसाठी उपस्थित असेल. बाकीच्या स्पर्धेसाठी आम्हाला पुढचे नियोजन करायचे आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.

रेनेगेड्सच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्यांना पहिल्या दोन सामन्यात एक विजय आणि एका पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या दोन्ही सामन्यात हरमनप्रीत कौर खेळू शकली नाही. आगामी काळात होणार्‍या मोठ्या टूर्नामेंटच्या पार्श्वभूमीवर हरमनप्रीत कौरला बिग बॅशमधून आपले नाव मागे घ्यावे लागले आहे. आता ती किती लवकर फिट होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय संघाच्या नजरा पुढील वर्षी होणाऱ्या महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेवर असतील.

दरम्यान, भारताची दुसरी स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्जने आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी केली. तिने स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावल्या. जेमीमा बिग बॅश लीग (BBL)मध्ये 'मेलबर्न स्टार्स' संघामध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच पूजा वस्त्राकर ब्रिस्बेन हीट संघात सामील होणार आहे. त्याचवेळी, इंग्लंडची स्टार खेळाडू डॅनियल व्याटही पूजासोबत या संघात सामील होत आहे, जी सलामीचा सामना खेळू शकली नाही. हरमनप्रीतशिवाय मैदानात उतरलेल्या रेनेगेड्सचा मागील सामन्यात ब्रिस्बेन हीटकडून पराभव झाला होता. ब्रिस्बेनच्या संघाने आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT