अहमदाबाद; वृत्तसंस्था : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुणतालिकेत सतत चढ-उतार होत असून, स्पर्धेच्या सुरुवातीला तळात असलेला ऑस्ट्रेलिया संघ आता तिसर्या स्थानी आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडवर 33 धावांनी विजय मिळवल्याने त्यांना उपांत्य फेरी जवळ आली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
शनिवारच्या दुसर्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला 286 धावांत रोखले. परंतु, इंग्लिश फलंदाजांना या धावांचा पाठलाग जमला नाही. त्यांचा डाव 253 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून डेव्हिड मलान (50) आणि बेन स्टोक्स (64) यांनी अर्धशतके केली. मोईन अली (42), ख्रिस वोक्स (32) यांनी त्यांना हातभार लावला. परंतु, जॉनी बेअरस्टो (0), जो रूट (13) जोस बटलर (1) यांच्या अपयशाने इंग्लंडला सलग पाचव्या पराभवाच्या खाईत लोटले.
तत्पूर्वी, ख्रिस वोक्सने कागारूंच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. ट्रॅव्हीस हेड (11) व डेव्हिड वॉर्नर (15) यांच्या विकेटनंतर स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनी तिसर्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. नंतर आदील राशीदच्या फिरकीने कमाल केली. स्मिथ 44 धावांवर माघारी परतला. पाठोपाठ राशीदने जॉश इंग्लिसला (3) बाद केले. लाबुशेनची 71 धावांची खेळी मार्क वूडने संपुष्टात आणली. डेव्हिड विलीच्या चेंडूवर ग्रीनचा (47) त्रिफळा उडाला. लिएम लिव्हिंगस्टोनने स्टॉयनिसला (35) बाद केले. कर्णधार पॅट कमिन्सही (10) लगेच बाद झाला. अॅडम झम्पाच्या उपयुक्त 29 धावांमुळे ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 286 धावांपर्यंत मजल मारली.
हेही वाचा :