

गेवराई : मराठा आरक्षणासाठी दुसऱ्या टप्प्यातील नऊ दिवस झालेल्या आंदोलनाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. निवृत्त न्यायमूर्ती आणि शासनाच्या शिष्टमंडळाने केलेल्या शिष्टाईमुळे मनोज जरांगे- पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी त्यांनी शासनाला दोन महिन्याचा वेळ दिला आहे. त्यामुळे शासनाने आता तरी दिलेल्या वेळेत आरक्षण द्यावे, वेळ काढूपणा करू नये, अशी भूमिका गेवराई तालुक्यातील मराठा आंदोलकांनी व्यक्त केली आहे. (Maratha Reservation)
मराठा आरक्षणासाठी जरांगे- पाटील यांनी 25 ऑक्टोबररोजी दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला सुरूवात केली होती. त्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. 27 ऑक्टोबर रोजी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही भ्रमणध्वनीवर संपर्क साधत आंदोलनाला पाठिंबा दिला होता. 28 ऑक्टोबररोजी धनगर समाजाचे बाळासाहेब दोडतले, उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला.
29 ऑक्टोबर रोजी गावोगावी अमर उपोषणाला सुरूवात झाली. आणि या दिवशी ठिक ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात आले. 30 ऑक्टोबररोजी मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी जरांगे यांच्याशी संवाद साधला. 31 ऑक्टोबररोजी छत्रपती शाहू महाराज यांनी जरांगे -पाटील यांची भेट घेतली. इंटरनेट सेवा बंद झाल्याने एकच गोंधळ उडाला आणि रात्रीच्या सुमारास अंतरवली सराटीत हजारो युवक दाखल झाले. 1 नोव्हेंबररोजी जरांगे – पाटील यांनी पाणी पिणे बंद केले. याच दिवशी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
उपोषणाच्या नवव्या दिवशी निवृत्त न्यायमूर्ती आणि शासकीय शिष्टमंडळाने केलेली शिष्टाई कामी आली, आणि जरांगे- पाटील यांनी उपोषण मागे घेतले. जरांगे- पाटील यांच्या आदेशान्वये गेवराई तालुक्यात ठिकठिकाणी आजही साखळी उपोषण चालू आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. अन्न त्याग सुद्धा केला आहे. मादळमोही येथील 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीही उपोषणाला बसली होती.
मराठा आरक्षणासाठी जरांगे- पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरु केलेले दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सरकारकडून 60 दिवसांचा अवधी देऊन 2 नोव्हेंबररोजी स्थगित केले आहे. आता सरकारने दिलेली वेळ पाळून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, पुन्हा आमच्यावर उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये, अशा भावना अंतरवाली सराटी येथील गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सरकारला दोन महिन्यांची वेळ दिली आहे. आता आरक्षण मिळालेच पाहिजे, अन्यथा जरांगे -पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आंदोलन करू, शासनाने आता तरी मराठा समाजाला न्याय द्यावा.
– योगेश गाडे, मराठा आंदोलक गेवराई
मराठा आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून लढा सुरू आहे. जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा व्यापक झाला आहे. शासनाने समितीने दिलेल्या पुराव्यांच्या आधार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे. माझे वय ८० असून मी या लढ्याचा साक्षीदार होतो, यांचा मला अभिमान आहे, आमचे तर वय झाले आहे, पण पुढच्या पिढीला न्याय मिळावा.
– जनार्दन सवासे, मराठा आंदोलक, ज्येष्ठ नागरिक मादळमोही
हेही वाचा