Latest

औरंगाबाद : वाचाळवीरांना आवरा, राज्याचे प्रश्न बाजूला पडत आहेत : अजित पवारांचे खडेबोल

मोहन कारंडे

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : सध्या राज्यातील राजकीय चित्र समाधानकारक नाही, वातावरण गढूळ झालं आहे, कुणाला काय बोलावं, कसं बोलावं, शब्दप्रयोग काय वापरावे याचे भान राहिले नाही. राज्यातील महत्त्‍वाचे प्रश्न बाजूला पडत आहेत. त्यामुळे अशा वाचाळवीरांना त्यांच्याच पक्षातील वरिष्ठांनी आवरले पाहिजे. पक्षातील लोक सातत्याने चुकीचे बोलत असतील, तर त्याची पक्षातील वरिष्ठांनी नोंद घेतली पाहिजे, त्यांना समजावून सांगितले पाहिजे, असे खडेबोल विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनावले.

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उत्कर्ष पॅनलकडून नवनिर्वाचित अधिसभा, विद्यापरिषद सदस्यांचा तसेच पॅनलचे प्रमुख आ. सतीश चव्हाण, डॉ. शिवाजी मदन यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते आज (दि.११) करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, राज्यात कोणी काहीही बोलतो, त्यात सत्ताधारी मंडळी आघाडीवर आहेत, अशांना आवरले पाहिजे. मात्र ते घडताना दिसत नाही. आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या काही लोकांमुळे सर्वसामान्य जनतेला वाटते की, सर्वच राजकीय लोक एकाच माळेचे मणी आहेत. हे प्रकार थांबले पाहिजेत. राज्यातील बेरोजगारी व इतर महत्त्‍वाचे प्रश्न बाजूला पडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले त्यावेळच्या पदवधीधर निवडणुकीत आपला विजय होतो की नाही, याबद्दल आम्ही साशंक होतो, परंतू सतीश चव्हाण यांनी विजय मिळविला. सध्या स्पर्धा मोठी आहे, नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी विद्यापीठात नवीन गोष्टी राबविणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शिक्षणक्षेत्रातील हस्तक्षेपावर बोट ठेवत टीका केली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मनुवादी विचार लादण्याचा प्रयत्न होत आहे. या विचाराचा पराभव करण्यासाठी आपण आपल्या संस्थेत लक्ष देऊन कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उत्कर्ष पॅनलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. राजेश करपे यांनी केले. यावेळी माजी आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी महापौर नंदकुमार घोडले, रंगनाथ काळे, डॉ नरेंद्र काळे, डॉ. राम चव्हाण, डॉ. राजेश करपे, फुलचंद सलामपुरे आदी उपस्थित होते.

पाणी कुठं मुरतंय ? ३०० कोटींची योजना २८०० कोटींवर गेली कशी?

औरंगाबाद शहराला कुठे पाच तर कुठे सात तर कुठे पंधरा दिवसांनी पाणी मिळते, उशाला धरण आहे तरी पाणी मिळत नाही. पाणी पुरवठ्याची योजना ३०० कोटींवरून २८०० कोटींवर गेली. पाणी कुठं मुरतंय? असा प्रश्न करत मतदान करणाऱ्या नागरीकांना दोष द्यायचा की निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना दोष द्यायचा, ही शोकांतिका आहे असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

सत्ताधाऱ्यांचेही 'दादा'

उत्कर्ष पॅनलने अधिसभेच्या ३८ जागांपैकी ३१ जागांवर, विद्यापरिषदेच्या ६ जागांपैकी ५ जागेवर दणदणीत विजय मिळवल्याकडे
डॉ. मदन यांनी लक्ष वेधतांना अजितदादा विरोधकांचेही दादा असल्याचे म्हणाले. यावेळी हजरजबाबीपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांनी विरोधी पक्षाचे नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे म्हणा, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT