Latest

Asthma : पावसाळ्यात का वाढतो दमा?

backup backup

पावसाळ्यात 'अस्थमा' म्हणजे दम्याचा अ‍ॅटॅक येण्याची शक्यता वाढते. अर्थात थोडी सावधगिरी आणि थोडी काळजी घेतली तर दम्याचाही मुकाबला चांगल्या प्रकारे करता येतो. पावसाळ्याच्या दिवसात पोलेन ग्रेन म्हणजे परागकणांचा फैलाव जास्त असतो. त्याशिवाय पावसाळी हवामानामुळे हवेत एक प्रकारचा कुंदपणा असतो आणि या वातावरणात बुरशीची वाढ होते. यामुळे दमा बळावतो. पावसामुळे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईडसारख्या द्राव्य रासायनिक घटकांमुळे वायू प्रदूषणही वाढते, त्यामुळेही दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. पावसाळ्यात वाढणार्‍या व्हायरल इन्फेक्शनमुळेही दम्याच्या रुग्णांचा त्रास वाढतो.

Asthma : प्रतिबंधात्मक उपाय

काही गोष्टी अंमलात आणून दम्याच्या विकारावर नियंत्रण ठेवता येते. दम्याची औषधे वेळेवर आणि नियमितपणे घ्यावीत. दम्याचे अधिकांश रुग्ण श्वासोच्छ्वास सुलभ करणारी कोर्टिकोस्टरॉयड घेतात, कारण त्यांना श्वास घेताना त्रास होत असतो. नियमितपणे औषधे घेतल्यास दम्याचा त्रास आणि धोका कमी होतो. डॉक्टरांनी जर दम्याची औषधे रोज घेण्यास सांगितले असेल तर त्याप्रमाणे रुग्णांनी औषधे घेतली पाहिजेत.

Asthma : अस्थमाचा धोका कमी कसा होईल?

ओलसर आणि कोंदट जागा पूर्णपणे कोरडी करा. कोंदटपणा घालवणार्‍या साधनांचा वापर करून दमटपणा 25 ते 50 टक्क्यांपर्यंत ठेवा
शक्य असेल तर एसीचा वापर करा. बाथरूमची नियमितपणे स्वच्छता करा आणि बॅक्टेरिया नष्ट होतील अशा प्रॉडक्टचा स्वच्छता करण्यासाठी वापर करा. एक्झॉस्ट फॅनचा वापर करा आणि घरात ओलसरपणा राहू देऊ नका.

रोपट्यांना बेडरूममधून बाहेर ठेवा

पेंटिंग करताना पेंटमध्ये बुरशी नष्ट करणार्‍या केमिकलचा वापर करा. म्हणजे भिंतींना बुरशी धरणार नाही. जिथे बुरशी आली असेल ती जागा लगेच स्वच्छ करा. हवेत कोंदटपणा असेल किंवा जोरात वारे वाहत असतील तर घरातच थांबा. कारण अशा वेळी वातावरणात पॉलेन ग्रेनचे प्रमाण खूप असते. गालिचे स्वच्छ करताना चेहर्‍यावर मास्क लावा. घरात कुणाला दमा असेल तर स्वच्छता करताना व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करू नका. ओल्या कपड्याने फरशीवरील धूळ साफ करा. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत, अशा मित्र-मैत्रिणींकडे किंवा नातेवाईकांच्या घरात जास्त वेळ थांबू नका. तिथे जाताना आपली दम्यावरची औषधे घेऊन जा.

Asthma : पथ्ये सांभाळा

दम्याच्या रुग्णांनी हलका आहार घ्यावा. पचायला जड आहार घेतल्याने श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे तणाव, चिंता, भीती याचा अतिरेक होऊ देणेही धोक्याचे असते. दम्याचा विकार जडण्याचे हेही कारण असू शकते. दम्याच्या रुग्णांनी रोज श्वसनाचा व्यायाम करा. मोहरीच्या तेलाने छातीवर मसाज केल्याने आराम वाटतो. झोपताना जाड उशी घेऊन झोपा, त्यामुळे आराम मिळतो. जवळ इन्हेलर बाळगावा. अस्थमाच्या रुग्णांनी मोकळया आणि ताज्या हवेत जास्तीत जास्त वेळ राहावे. आठवड्यातून एक दिवस उपवास केला तर जास्त चांगले. शरीरात आम्ल तयार करणारे पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रीट, फॅट्स आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन कमी करावे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अस्थमा पूर्णपणे बरा होत नाही. पण त्याला नियंत्रणात ठेवता येते. म्हणूनच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

अस्थम्याची लक्षणे

धाप लागणे, छातीत दुखणे किंवा आवळल्यासारखे वाटणे, श्वास लागत असल्याने झोप न येणे, कफ होणे, खोकला येणे आणि घरघर होणे, श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणे, फ्लू किंवा सर्दी झाली तर अस्थम्याचा तीव्र झटका येणे.

Asthma : अस्थम्याचे प्रकार

थंडी आणि कोरड्या हवेमुळे तीव्र होणारा अस्थमा. कामाच्या ठिकाणी होणारा अस्थमा, म्हणजे रासायनिक द्रव्ये, धूर किंवा धुळीमुळे होणारा अस्थमा आणि अ‍ॅलर्जीमुळे होणारा अस्थमा. अस्थम्याची लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य असते. अस्थम्याची लक्षणे वारंवार उद्भवू लागली तर दुर्लक्ष करू नका. अस्थमा कोणत्याही वेळी आणि कोणत्याही वयात होऊ शकतो याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT