Latest

Assembly Election Result : कौन बनेगा मुख्यमंत्री! राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडकडे सर्वांच्या नजरा

सोनाली जाधव

पुढारी वृत्तसेवा :  राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. या राज्यांत मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्यासाठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजप पक्षश्रेष्ठींनी तिन्ही राज्यांतील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून भावी मुख्यमंत्रिपदाबाबत खलबते केली.

१ ) राजस्थान

वसुंधराराजे
वसुंधराराजे यांनी पूर्वी मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. त्यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यांच्याशिवाय ओम बिर्ला, गजेंद्रसिंह शेखावत, सी. पी. जोशी यांचीही नावे चर्चेत आहेत.
दियाकुमारी
राजघराण्याशी संबंधित असलेल्या दियाकुमारी यांनी तब्बल ७१ हजार मताधिक्याने विजय संपादन केला आहे. वसुंधराराजे यांना पर्यायी म्हणून त्यांचे नाव पुढे आले आहे.
महंत बालकनाथ
बालकनाथ हे खासदार आहेत. त्यांनी तिजारी येथून विजय प्राप्त केला आहे. ते नाथ संप्रदायाचे आठवे मुख्य महंत आहेत, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राजस्थानात त्यांना मुख्यमंत्रिपदी नियुक्तकरण्याच्या हालचाली सुरू आहेत. पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिल्लीला पाचारण केले आहे.

२ ) छत्तीसगड

डॉ. रमणसिंह
माजी मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्या नावावर एकमत होण्याची चिन्हे नाहीत. रमणसिंह यांच्याशिवाय सरोज पांडे, बृजमोहन अग्रवाल, ओपी चौधरी, लता उसेंडी यांच्या नावाचीही चर्चा आहे.
अरुण साव
छत्तीसगडमध्ये भाजपचा विस्तार करण्यासाठी साव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. ते ओबीसी नेते आहेत.
रेणुका सिंह
सिंह या केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे नावही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहे. त्या आदिवासी समुदायातील आहेत.

१ ) मध्यप्रदेश

शिवराजसिंह चौहान
मध्य प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 'लाडली बहना' योजनेतून सत्ता खेचली असली तरी त्यांची पुन्हा वर्णी लागण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. व्ही. डी. शर्मा, कैलास विजयवर्गी, प्रल्हाद पटेल यांच्या गटाकडूनही मोर्वेबांधणी सुरू आहे.
ज्योतिरादित्य शिंदे
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही चर्चा आहे. शिंदे काँग्रेसमधून 'भाजपत आले आहेत. त्यांना संधी दिल्यास अंतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्यता आहे. शिंदेंमुळे ग्वाल्हेर-चंबळमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
नरेंद्रसिंह तोमर
केंद्रीय मंत्री असलेले तोमर यांच्या समर्थकांकडूनही मुख्यमंत्रिपदावर प्रबळ दावा ठोकला जाण्याची शक्यता आहे. निकालानंतर त्यांना पक्षश्रेष्ठींनीदिल्लीला बोलावले आहे.

मध्य प्रदेशात राहुल गांधी यांची भारत जोडो निरर्थक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान मध्य प्रदेशातील
अनेक मतदारसंघ पिंजून काढले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजप गड राखणार की गमावणार, याबाबत उत्सुकता होती. गेल्या निवडणुकीपेक्षा या खेपेस काँग्रेसला मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ३८० किमी अंतराची होती. मध्य प्रदेशातील २१ मतदारसंघांत ही यात्रा पोहोचली होती. मध्य प्रदेशातील मतदारांनी भारत जोडोला प्रतिसाद दिला नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले. 'भारत जोडोतील २१ मतदारसंघांपैकी १७ ठिकाणी भाजप उमेदवारांचा विजय झाला आहे.

चुकीच्या जागावाटपामुळे काँग्रेसचा पराभव : ममता

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे, लोकांचा नव्हे, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी दिली. ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. इंडिया आघाडीतील घटक पक्षांना जागा वाटपात स्थान न दिल्यामुळे त्या नाराज आहेत. उपरोक्त राज्यात चुकीच्या पद्धतीने जागावाटप झाले. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला, असेस्पष्ट करत बुधवारी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT