Latest

Asian tiger : ‘हा’ डास पोहोचवू शकतो कोमात!

Arun Patil

बर्लिन : डासांमुळे अनेक रोगजंतूंचा फैलाव होत असतो. डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका, मलेरियासारख्या आजारांचा फैलाव डासांमुळेच होत असतो. एक डास तर असा आहे ज्याचा दंश झाल्यावर माणूस कोमातही जाऊ शकतो. जर्मनीत तशी घटना अलीकडेच घडली आहे. या डासाचे नाव आहे 'एशियन टायगर'. ( Asian tiger )

Asian tiger चा दंश, रुग्‍ण चार आठवडे कोमात

जर्मनीतील रोडरमार्क येथे राहणार्‍या एका व्यक्तीला एशियन टायगर डासाचा दंश झाला होता. या माणसाचे नाव सेबस्टियन रोत्श्के असे आहे. त्याला आधी हलका ताप आला व नंतर स्थिती इतकी बिघडली की त्याचे यकृत, किडनी, हृदय आणि फुफ्फुसेही निकामी होण्याची वेळ आली. त्याची डावी जांघ या डासामधून संक्रमित झालेल्या बॅक्टेरियाने म्हणजेच जीवाणूने पूर्णपणे खाल्ली होती. हा रुग्‍ण चार आठवडे कोमात गेला होता. डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी सुमारे 30 शस्त्रक्रिया केल्या. तसेच त्याच्या जांघेवर त्वचा प्रत्यारोपणही करण्यात आले.

इतक्या उपचारांनंतर अखेर तो कोमामधून बाहेर आला व त्याचे प्राण वाचवण्यात यश आले. या 'एशियन टायगर' डासाचे वैज्ञानिक नाव 'एडीज अल्बोपिक्टस' असे आहे. त्याला 'फॉरेस्ट मॉस्क्युटो' असेही म्हटले जाते. हे डास मूळात आग्नेय आशियामध्ये आढळत होते व नंतर मालवाहतूक व अन्य कारणांमुळे जगभर फैलावले. त्यांच्या पायावर व शरीरावर पांढरे पट्टे असतात. या डासांमुळेही पिवळा ताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका आदी आजारांचा फैलाव होतो.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT