Latest

अरविंद केजरीवालांकडे फक्त ‘पोल्युशन’ आहे ‘सोल्युशन’ नाही : भाजप

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्या प्रदूषणाचा मुद्दा सध्या देशभर चर्चेचा विषय झाला असून आता भाजपनेही याबाबतीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि खासदार मनोज तिवारी यांनी आज (दि.४) पत्रकार परिषद घेऊन प्रदूषणाबाबतीत 'आप' सरकारला धारेवर धरले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केवळ प्रदूषण आहे, त्यावर उपाय नाही असे बोलताना पात्रा यांनी 'केजरीवाल हे दिल्लीचे अर्धवेळ मुख्यमंत्री असून दिल्ली सरकार लोकांच्या जीवाशी खेळत आहे' असा आरोप केला.

दिल्ली सरकारच्या कामगार मंत्रालयाने नोंदणी केलेल्या 10 लाखांपैकी 2 लाख बनावट कामगार आहेत. तर 4-5 कामगार एकाच क्रमांकावर नोंदणीकृत आहेत,असा गंभीर आरोपही पात्रा यांनी यावेळी केला आहे. अशा प्रकारे बनावट नोंदणी करून पैसे काढले जातात व ते पक्षासाठी खर्च केले जातात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पात्रा पुढे म्हणाले, बांधकाम कामगारांसाठी काम करणाऱ्या तीन गैर-सरकारी संस्थांनी (एनजीओ) दिल्लीतील कामगारांच्या नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत दोन लाख बनावट बांधकाम कामगारांची नोंदणी झाल्याचे तपासात समोर आले आहे. ६५ हजार कामगारांच्या नावावर फक्त एकच मोबाईल क्रमांक नोंदवला आहे. तसेच, अरविंद केजरीवालांचे मनच प्रदूषित असून त्यामुळे संपूर्ण दिल्ली भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाने ग्रासली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT