पुढारी ऑनलाईन डेस्क: आपच्या दिल्लीतील ७ आमदारांना भाजपने संपर्क साधला आहे. त्यांना भाजपमध्ये येण्यासाठी प्रत्येकी २५ कोटी रूपयांची ऑफर दिली आहे, असा गंभीर आरोप आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. या संदर्भातील एक्स पोस्ट केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. (Arvind Kejriwal On BJP)
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अलीकडेच त्यांनी आमच्या दिल्लीतील ७ आमदारांशी संपर्क साधला आहे. या वेळी सांगितले की, "आम्ही केजरीवाल यांना काही दिवसांनी अटक करू. त्यानंतर आमदार फोडू. आपमधील २१ आमदारांशी आमची चर्चा झाली आहे. इतरांशीही बोलणे सुरू आहे. त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. तुम्ही पण येऊ शकता. २५ कोटी रूपये देणार यासाठी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागेल, अशी भाजपने ऑफर दिल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर केला आहे. (Arvind Kejriwal On BJP)
क़ैजरीवाल यांनी म्हटलं आहे की, आमच्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत केवळ ७ आमदारांशी संपर्क साधला असून त्या सर्वांनी नकार दिला आहे. याचा अर्थ दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्याचा त्यांचा डाव आहे. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. आमचे सर्व आमदारही भक्कमपणे एकत्र आहेत, असा दावाही त्यांनी केला. (Arvind Kejriwal On BJP)
आमच्या सरकारने जनतेसाठी किती काम केले हे दिल्लीतील लोकांना माहीत आहे. भाजपने निर्माण केलेल्या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही खूप काही साध्य केले आहे. दिल्लीतील लोकांचे 'आप' वर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे निवडणुकीत 'आप'चा पराभव करणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांना बनावट दारू घोटाळ्याच्या निमित्ताने मला अटक करून त्यांना आपचे सरकार पाडायचे आहे, असेही केजरीवाल म्हणाले.