Latest

Bharat Jodo Yatra : राजधानीत शनिवारी ‘भारत जोडो यात्रे’चे आगमन

अविनाश सुतार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : कडाक्याच्या थंडीत राजधानी दिल्लीत  शनिवारी (दि.२४) सकाळी भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra) आगमन होईल. यात्रेच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे. यात्रेमुळे वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी आहे. अशात राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात सकाळी पडणाऱ्या धुक्यातून यात्रेला मार्गक्रमण करावे लागत आहे. दृष्यमानता अत्यंत कमी असल्याने याचा प्रभाव यात्रेच्या गतीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळी फरिदाबाद-दिल्लीच्या सीमेवरील बदरपूर भागातून यात्रा दिल्लीत प्रवेश करेल. शुक्रवारी रात्री फरिदाबाद येथे यात्रा  (Bharat Jodo Yatra) मुक्कामी राहील. दिल्लीत प्रवेश केल्यानंतर अपोला हॉस्पीटल मार्गे यात्रा आश्रम, निझामुद्दीन, इंडिया गेट, आयटीओ, दिल्ली गेट, दारियागंज, लाल किल्ल्यावर पोहोचेल. जुन्या दिल्लीत यात्रेमुळे वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी दिल्ली पोलिसांना विशेष प्रयत्न करावे लागतील. दिल्लीत लाल किल्ल्यावर यात्रा थांबेल. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र मार्गावरून यात्रा राजघाटापर्यंत जाईल. ९ दिवसांच्या विश्रांतीनंतर ३ जानेवारीला यात्रा कश्मिरच्या दिशेने मार्गस्थ होईल, असे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

काँग्रेसने पूर्व नियोजित मार्गानुसार यात्रा बदरपूर वरुन मथुरा रोड, आश्रम चौक, निझामुद्दीन, झाकिर हुसैन मार्ग, इंडिया, गेट, आयटीओ तसेच दिल्ली गेट होत लाल किल्ल्यापर्यंत पोहोचेल. परंतु, उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाजवळ कलम १४४ लागू असल्याने यात्रेला मथुरा रोड, आश्रम चौक-रिंग रोड-लाल किल्ला असा पर्याय पोलिसांनी सूचवला आहे. यामुळे दिल्लीतील वाहतूक खोळंबण्याची शक्यता कमी आहे. परंतु, वृत्त लिहेपर्यंत यात्रेच्या प्रस्तावित मार्गात बदल करण्यात असल्यासंबंधी कुठलीही माहिती मिळाली नाही.
७ सप्टेंबरला कन्याकुमारीपासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा नऊ राज्य तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंधप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणातून दिल्लीत पोहचली आहे. यात्रेतील कंटेनरची दुरूस्ती करीता यात्रेला विश्रांती देण्यात येईल.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT