Latest

संभाजी भिडे यांना अटक करा, ते बहुजनांच्या पोरांना भडकावताय : छगन भुजबळ

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. भिडे यांनी केलेले वक्तव्य इतरांनी केले असते, तर त्यास देशद्रोही म्हणून अटक केली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकावत असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले.

'संभाजी भिडे यांनी १५ आॅगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी दुखवटा पाळावा' अशाप्रकारचे वादग्रस्त विधान केले होते. दरम्यान, भिडे यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी अटकेची मागणी केली आहे. यावेळी सरकारवर टीका करताना भुजबळ म्हणाले की, शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी लोकांना बळजबरीने बोलावले जात आहे. एक दिवस तुमच्यासाठी द्यायचा म्हणजे गरिबांची रोजीरोटी बुडत असल्याचेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या केलेल्या पाहणीवर भुजबळ म्हणाले की, पहिल्या पावसात कुठल्याही शहरात रस्ते तुंबण्याचे प्रकार घडतात. यावर शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ट्रॅफिक पोलिसांना खड्डा कुठे आहे, याची माहिती असते. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना ताबडतोब कल्पना द्यावी. मुंबईतला काही भाग बशीसारखा आहे, त्यामुळे पाणी साचतेच. गटार जर नीट साफ केली नाही, तर असे प्रश्न उद्भवतात. मुख्यमंत्री फिरत आहे, ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.

पुण्यातील घटनेवर बोलताना भुजबळ म्हणाले, 'महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी काम केलेल्या पुण्यभूमीत काय चालू आहे? पोलिस आयुक्त काय करतात? यावर कडक कारवाई करा. न्यायव्यवस्थेनेदेखील जरासुद्धा दया दाखवता कामा नये. राष्ट्रवादीची दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत भुजबळ म्हणाले, 'मला कल्पना नाही, मला त्या कार्यकारिणीचे आमंत्रण नाही, मी काही राष्ट्रीय कार्यकारिणीत नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT