Latest

अजित पवारांच्या पिंपरी दौर्‍यामुळे राष्ट्रवादी जोमात; प्रशासकीय राजवटीत महापालिका प्रकल्प उद्धघाटनाचा धडाका

अमृता चौगुले

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्धघाटन करीत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात अक्षरश: धुरळा उडविला. सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत तब्बल 20 कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजेरी लावत त्यांनी अनोखा विक्रम केला. पक्षाच्या मेळाव्यात पाच वर्षांत भाजपने केलेल्या कारभारावर सडकून टीका करीत महापालिका आता राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याचा सूचक इशारा विरोधकांसह मित्रपक्षांना दिला. या दौर्‍यामुळे पक्षात उत्साह दुणावला आहे.

महापालिका 12 मार्चला बरखास्त झाली. त्यानंतर पावणेतीन महिन्यांनंतर अजित पवार यांनी शहरात हजेरी लावली. या निमित्ताने शहरभरात 'पिंपरी-चिंचवडच्या विकासाला हवी पुन्हा वादळी गती' या टॅगलाइन खाली मोठेमोठे होर्डिंग लावत वातावरण निर्मिती करण्यात आली. सकाळी सातला पालिका भवनात हजेरी लावल्यानंतर पवार यांनी संपूर्ण शहरात फिरून उद्धघाटन आणि भूमीपूजनाचा मॅरेथॉन दौरा पूर्ण केला. प्रत्येक ठिकाणी बारकाईने पाहणी करीत आयुक्तांना सूचना केल्या.

दौर्‍यानंतर तुडुंब भरलेल्या चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील मेळाव्यात पवार यांनी तुफान फटकेबाजी करीत भाजपच्या पाच वर्षांतील कारभारावर टीकास्त्र सोडले. त्यातून भाजपचे स्थानिक नेतेही सुटले नाहीत. महापालिकेच्या अनेक नवीन योजनांची घोषणाही त्यांनी करून टाकली. आयुक्तांच्या स्वच्छतेसह अतिक्रमण कारवाईचे त्यांनी समर्थन केले. शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचे आदेश पोलिसांना दिले.

भाजपच्या मागील वर्षांतील कारभार पुसून काढत आता सत्ता राष्ट्रवादीच्या हातात असल्याचा संदेश त्यांनी आपल्या भाषणातील देहबोलीतून दिला. सत्तेत नसलेल्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली मरगळ या उत्साहपूर्ण दौर्‍यातून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. हा उत्साह निवडणुकीपर्यंत कायम राहिल्यास पक्षाला नक्कीच फायदा होईल, यात शंका नाही. तसेच, सर्वच आघाड्यावर नव्याने पदाधिकारी नियुक्त केल्याने संघटन मजबूत होत आहे. दुसरीकडे, भाजपमधून अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढत असल्याचा दावा केला जात आहे.

निवडणुकीत आघाडीबाबत भुमिका

राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवड शहरात मोठा पक्ष असून, शिवसेना व काँग्रेस या मित्रपक्षाला ताकदीनुसार जागा सोडल्या जातील. चर्चेतून मार्ग काढला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे आघाडी होणार असे सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. तसे झाल्यास मागच्या वेळेस पक्षाअंतर्गत झालेल्या दगाफटका यंदा होणार नाही, असा कयास बांधला जात आहे.

ईद-ए-मिलन कार्यक्रमातून सकारात्मक संदेश

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत भोसरीत 11 मे रोजी ईद-ए-मिलनचा कार्यक्रम झाला. त्यात सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंना सहभागी करून घेऊन एकात्मतेचा संदेश दिला गेला. भोंग्याचा विषय उकरून काढला जात आहे. जातीयतेचे खतपाणी घातले जात आहे. या परिस्थितीमध्ये या सर्वधर्मीय कार्यक्रमातून सकारात्मक संदेश देण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले.

SCROLL FOR NEXT