माझी वसुंधरा अभियान 2.0: लोणावळा शहराचा राज्यात दुसरा क्रमांक | पुढारी

माझी वसुंधरा अभियान 2.0: लोणावळा शहराचा राज्यात दुसरा क्रमांक

लोणावळा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये लोणावळा शहराने नेत्रदीपक कामगिरी केली असून नगरपरिषद विभागात लोणावळा शहराने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर बेस्ट परफॉर्म्स भुमी विभागात लोणावळा शहराचा पहिला क्रमांक आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर यश मिळवल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणार्‍या माझी वसुंधरा अभियानात देखील उल्लेखनीय यश प्राप्त करीत लोणावळा शहराने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माझी वसुंधरा 2.0 ची सुरुवात करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांनी 5 जुन 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधी मध्ये निसर्गाशी संबंधित पृथ्वी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागात केलेल्या कार्याचे मूल्यमापन करत सदरचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या; दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार

या अभियानात राज्यातील 11,969 स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोंदणी केली होती. यामध्ये 406 नागरी स्थानिक संस्था व वाढदिवसाच्या 11,563 ग्रामपंचायतींचा समावेश होता. लोणावळा शहराने या अभियानात सहभाग घेत शहरात व आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. प्रदुषण रोखण्यासाठी जनजागृती अभियान, सायकल रुट, सायक्लोथॉन असे अनेक उपक्रम राबविले. याची दखल घेत सदरचा पुरस्कार लोणावळा शहराला जाहिर करण्यात आला आहे.

भविष्यात लोणावळा शहराला स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्यासाठी लोणावळा नगरपरिषद सातत्यपूर्ण प्रयत्न करेल असा विश्वास माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी व्यक्त केला.

Back to top button