जनावरांच्या बाजारात मंदी! वाढत्या यांत्रिकीकरणाने बैल, खेचर, गाढवांना मागणी घटली | पुढारी

जनावरांच्या बाजारात मंदी! वाढत्या यांत्रिकीकरणाने बैल, खेचर, गाढवांना मागणी घटली

पिंपरी : सध्या प्रत्येक क्षेत्रात औद्योगिकरण झाले असल्याने कमी वेळेत जास्त काम करणार्‍या यंत्रांना मागणी वाढली आहेत. त्यामुळे अवजड ओझे वाहून नेण्यासाठी वापरात येणार्‍या जनावरांना मागणी कमी झाली आहे. जनावरांना बाजारात किंमत मिळणे कठीण झाले आहे. काम मिळत नसेल तर ही जनावरे पोसायची कशी, असा प्रश्न जनावरांच्या मालकांना पडला आहे.

बांधकाम साहित्य आणि शेती कामासाठी जनावरांची गरज भासत असते. परंतु, सध्या कमी वेळेत जास्त काम करणार्‍या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने जनावरांचा वापर कमी झाला आहे. दळणवळणाच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. तसेच, शेतीच्या कामांमध्ये यंत्रांचा वापर वाढला आहे. तर, बांधकाम साहित्य उत्पादनात यंत्रांचा वापर वाढल्याने श्रमाच्या कामांना लागणार्‍या जनावरांचे महत्व कमी झाले आहे.

गुरांच्या बाजारात मागणी कमी

मे महिन्यात पुणे जिल्ह्यात अनेक गावांचे उरूस होते. यात्रांच्या निमित्ताने अनेक गावांमध्ये गुरांचा बाजार भरवले जातात. या
बाजारात गाढव, खेचर यांना मागणी नसल्याने मालकांना जनावरे ने-आ करण्याचा मनस्ताप होतो. काम नसल्यामुळे मागणी नसलेल्या जनावरांना पोसायचे कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. बांधकामाचे ओझे वाहून नेण्यासाठी गाढवांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, यंदा गाढवांना भाव मिळाला नसल्याने गुरांच्या बाजारात गाढवांची संख्या कमी झाली आहे.

गुरांना सांभाळण्याचा खर्च अधिक

गुरांना सांभाळण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात आहे. पशु खाद्य, तसेच चार महाग झाल्याने जनावरांच्या मालकांना गुरांना सांभाळणे शक्य नाही. श्रमाच्या कामांना यंत्रांची जोड मिळाल्याने जनावरांची मागणी कमी झाली आहे.

खेचरांचा वापर झाला कमी

शेतीच्या कामांसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. परंतु, सध्या शेतीच्या कामांसाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बांधकाम साहित्य ने-आण करण्यासाठी गाढवांचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. परंतु, त्यात मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर होवू लागल्याने गाढवांचा वापर कमी झाला आहे. तर. गावांमध्ये खेचरांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यातदेखील ट्रॉलीचा वापर वाढल्याने खेचरांचा वापर पूर्णपणे बंद झाला आहे. बैलगाडीचा वापर दळणवळणासाठी अद्याप केला जातो. सध्या ऊस तोडणी, चारा-ने आण करण्यासाठी बैल गाड्यांचा वापर केला जात असल्याने बैलांना काही प्रमाणात मागणी आहे. परंतु. गाढव आणि खेचरांचा वापर पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहे.

सध्या गुरांचे बाजार खूप कमी भरतात. पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या कामांसाठी जनावरांची गरज असते. परंतु, यंदा जत्रांमध्ये खूप कमी प्रमाणात उलाढाल झाली. त्यामध्ये गायी, शेळ्या यांना मागणी जास्त होती. परंतु, गाढव आणि खेचरांना अजिबात मागणी नव्हती.
– पवन पाटील, पारगाव

बैल बाजारात यंदा मागणी खूप कमी आहे. शेतात यंत्रांचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक कामांसाठी यंत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतीसाठीदेखील बैलांची मागणी कमी झाली आहे.
-असिफ बागवान, चाकण

Back to top button