अमरावती, पुढारी वृत्तसेवा : लहानपणापासून नाट्य व चित्रपटसृष्टीत कलाकार म्हणून काम करण्याचं स्वप्न… नववीत असतांना आजारातून पाय गमावला…अपंगत्वानंतर परिस्थितीमुळे हॉस्टेलमध्ये राहून डी.एड केले. पुढे बीडीएस करून स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली. मधल्या काळात आयुष्यात आलेले नैराश्य निवार्णार्थ सायकलिंग केले. सायकलवर जडलेल्या प्रेमातून त्यांनी चार वर्षात तब्बल दोन लाख किमीपेक्षा अधिक प्रवास केला. हा प्रेरणादायी प्रवास चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमगाव येथील डॉ. राजू तुरकाने यांचा आहे.
कळमगाव येथील डॉ. राजू तुरकाने यांना लहानपणापासून अभिनयाचे वेड होते. वैद्यकीय शिक्षणानंतर अमरावतीहून थेट अहमदनगर गाठले. तिथे काही काळ दंतशल्य चिकित्सक म्हणून काम केले. पण नाटकाचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. दरम्यान फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टिटयूट अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केला. वाचनाचा छंद असल्याने इंगजीत एमए केले. त्यानंतर नगरहून थेट मुंबई गाठली. मित्रांच्या सहकार्यातून अंधेरी भागात छोटेसे क्लिनिक उभारून डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस सुरु केली. आयुष्यात आलेले अपंगत्व व काही आप्तांचे पूर्वानुभव यामुळे नैराश्य आले. या नैराश्यातून सायकलिंग करायला सुरुवात केली. सायकलिंगमुळे आत्मविश्वास पुन्हा परतला. पुढे नाटकांचे लेखनकार्य केले. त्यांचे 'इच्चकपणा' हे पुस्तक सुद्धा प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
सायकलिंगमुळे आयुष्यात वेगळी सुखद अनुभूती येऊ लागल्याने दररोज ५० ते ६० किमी व सुट्टीच्या दिवशी १०० किमी प्रवास करू लागले. महिन्याचे दोन ते अडीच हजार किमी प्रवास सायकलने होऊ लागल्यावर पुढे मुंबई ते दिल्ली, मुंबई ते पुणे, मुंबई ते नागपूर असा प्रवास सुद्धा सायकलने केला. २०१६ पासून सुरु झालेला हा प्रवास अद्याप सुरु असून त्यांनी चक्क एका पायावर दोन लाख पेक्षा अधिक अंतर सायकलने पार केले आहे. कदाचित राज्यात एका पायावर एवढे अंतर सायकलिंग करणारे ते एकमेव असावे.
सायकलिंग अनोखी ध्यानसाधना
अनेक लोकं आयुष्यात वेगवेगळे छंद जोपासतात. योग, प्राणायाम, ध्यान साधना करतात. माझ्या आयुष्यात अनेक आजारांवर मी सायकलिंगच्या माध्यमातून मात केली आहे. सायकलिंग हाच माझा छंद व साधना झाली असून यातून मला वेगळाच सुखद अनुभव येत आहे.
– डॉ. राजू तुरकाने
हेही वाचा :