पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज फलंदाज अंबाती रायडू याने आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्यापूर्वी आयपीएलमधून निवृत होणार असल्याची घोषणा केली आहे. रायडूने याबाबत एक ट्वीटवरुन माहिती दिली आहे. गुजरात विरुद्धच्या फायनल सामन्यात रायडू आयपीएलमधील अंतिम सामना खेळणार आहे. आजच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून सहाव्यांदा चॅम्पियन झालेल्या संघाचा भाग बनण्याची आशा त्याने व्यक्त केली आहे.
२०१९ च्या विश्वचषक संघात समावेश करण्यात न आल्यामुळे रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक सामने खेळले आहेत. अंबाती रायडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांसाठी खेळला आहे.त्याने एकूण २०४ सामने खेळले आहेत. १४ आयपीएल हंगाम, ११ प्लेऑफ, ८ फायनल आणि ५ आयपीएल वेळा चॅम्पियन झालेल्या संघाचा तो भाग राहिला आहे.