Veer Savarkar Jayanti : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी | पुढारी

Veer Savarkar Jayanti : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित रविवारी (दि. २८) सकाळी दिल्लीत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. नवीन महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन केले. यावेळी उपस्थित उपमुख्यमंत्र्यांसह खासदारांनी सावरकरांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतांना मुख्यमंत्री म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशक्त क्रांतीचा पुरस्कार करणारे महान देशभक्त आहेत. सावरकरांची जयंती पहिल्यांदाच महाराष्ट्र सदन येथे साजरी केली जात आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची,गौरवाची तसेच आनंदाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पहिल्यांदाच आग्रा येथे नुकतीच साजरी करण्यात आल्याचे शिंदे म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जे योगदान,त्याग सर्वांना सांगायची आवश्यकता नाही. सावरकर साहित्यिक होते,समाजसुधारक होते.आता सावकरांचे तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आले आहे.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून आपले प्रखर देशाभिमानी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत आहे,ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.त्यांनी अतिशय ऐतिहासिक अशा वास्तूची संकल्पना मांडली आहे.या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण होत आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.संपूर्ण देशाला अभिमान वाटेल अशा या नवीन वास्तूमध्ये लोकशाही अधिक बळकट होईल, वृद्धिंगत होईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.आजचा दिवस हा १४० कोटी लोकांसाठी अभिमानाचा दिवस आहे. विक्रमी वेळेत संसदेचे बांधकाम पूर्ण केल्याबद्दल देखील शिंदे यांनी पंतप्रधानांची आभार मानले.

कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील,कपिल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, उन्मेश पाटील, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडिक, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, रणजित सिंह नाईक-निंबाळकर, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, राजेंद्र गावित यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री तसेच मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, प्रख्यात शिल्पकार श्रीराम सुतार देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

Back to top button