Latest

अजितदादा तुम्हीही मुख्यमंत्री होणार!: राजू पाटील यांनी उलगडला शिरडशहापूर भेटीचा योग

अविनाश सुतार

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : सुधाकरराव नाईक शिरडशहापूरला आले अन् मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काँग्रेस नेते विलासराव देशमुख आणि भाजप नेते देंवेद्र फडणवीस शिरडशहापूरला आले अन् थेट मुख्यमंत्री झाले. त्यामुळे दादा, आज तुम्ही शिरडशहापूरला आला. २०२४ ला तुम्हीही मुख्यमंत्री होणार, असे भाकीत आमदार राजू पाटील नवघरे यांनी केले. शिरडशहापूरला नेत्यांची भेट आणि मुख्यमंत्री पदाचा योगायोग नवघरे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत उलगडला.

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे आमदार राजू पाटील नवघरे यांच्या प्रयत्नाने आदिवासी मुला-मुलींच्या आश्रमशाळेसाठी ३२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शाळेचा पायाभरणी सोहळा, शेतकरी व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, आमदार विक्रम काळे, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, मुनीर पटेल आदी उपस्थित होते.

यावेळी आ. नवघरे यांनी राज्याला मिळालेल्या तीन कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री पदाचा संबंध शिरडशहापूरशी कसा आहे, हे आपल्या भाषणातून उलगडला. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस हे शिरडशहापूरला आल्यानंतर थेट मुख्यमंत्री झाले. आता तुम्हीही शिरडशहापूर येथे आला आहात, भविष्यात तुम्हालाही मुख्यमंत्री पदाची संधी आहे. असे मागील योगायोगावरून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

पांढरे कपडे घालून मी फिरलो नाही, तर सभागृहात तीन वेळा वाद घालून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. अठरा पगड जातीसह शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी आपला आगामी काळात प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे नवघरे यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT