पिंपरी : बदला घेण्याची हीच वेळ; कामाला लागा ; अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना आवाहन | पुढारी

पिंपरी : बदला घेण्याची हीच वेळ; कामाला लागा ; अजित पवार यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना आवाहन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्र राज्यामध्ये गलिच्छ राजकारण झाले. त्यामध्ये महाविकास आघाडीला सत्ता गमवावी लागली. त्याचा बदला घेण्याची संधी चिंचवड विधासनभेच्या पोटनिवडणुकीत आहे. कामाला लागा. सर्व ताकदीने लढून त्या गलिच्छ राजकारणाला उत्तर द्या, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी (दि. 9) केले. थेरगाव येथील मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलचे अध्यक्ष व कार्यकारणी, पदाधिकारी, आजी व माजी नगरसेवक यांची बैठक पवार यांनी घेतला, त्या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

बैठकीस महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, पक्षाचे निरीक्षक आमदार सुनील शेळके, आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे व पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, की राज्यामध्ये गेल्या वर्षी गलिच्छ राजकारण सुरू झाले. त्याला उत्तर या निवडणुकीतून द्या.  भाजपचे अण्णा जोशी हे खासदार झाल्याने कसबा विधानसभेची जागा रिकामी झाली होती. त्या 1991 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने वसंत थोरात यांना उमेदवारी दिली होती. सर्व शक्ती पणाला लावून सर्वांनी एकजुठीने काम केले आणि तेथे विजयाचा झेंडा फडकला. याप्रमाणे रूसवे फुगवे बाजूला सारून पक्षासाठी एकीने लढा, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

सन 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भूलथापा देत भाजपने सत्ता मिळवली. आंद्रा व भामा-आसखेड धरणाचे पाणी त्यापूर्वीच मंजूर केले होते. पुण्यात पाणी आले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील घरांमध्ये अद्याप पाणी आलेले नाही. महापालिकेने भाजपने मोठ्या प्रमाणात भ—ष्टाचार केला आहे.  चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठ्या हाउसिंग सोसायट्या आहेत. त्यांचे प्रश्न भाजपला पाच वर्षात सोडवता आले नाहीत. ती माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.

Back to top button