राजगुरूनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी खेड तालुक्यातील दोन माजी आमदार गटांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उघड समर्थन दिले आहे. माजी आमदार दिवंगत साहेबराव सातकर यांचे चिरंजीव राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष व तालुक्यात विविध पदे भूषविणारे हिरामण सातकर यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षपद देण्यात आले.
संबंधित बातम्या :
खासदार शरद पवार यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१८) पुणे येथे नियुक्ती पत्र देण्यात आले. माजी आमदार दिवंगत साहेबराव बुट्टे पाटील यांचे चिरंजीव तसेच खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड देवेंद्र बुट्टे पाटील, ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर हे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. या बदलाने खेड तालुक्याच्या राजकरणात नवे राजकीय समीकरण अस्तित्वात येणार आहे. एका अर्थाने या माध्यमातुन अजित पवार समर्थक आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पर्याय उभा राहणार असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटी नंतर खेड तालुक्यातील सर्व नेते, कार्यकर्ते अजित पवार गटाशी जुळलेले होते. तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व जण अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे संकेत मिळत होते. तथापि तालुक्यात मोठी राजकीय ताकद असलेले तालुक्याचे माजी आमदार, सहकार महर्षी दिवंगत साहेबराव सातकर आणि माजी आमदार दिवंगत साहेबराव बुट्टे पाटील गटाने आपली भुमिका स्पष्ट केली नव्हती. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात पण शरद पवारांच्या आदेशाला मानणारे हे नेते आहेत.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांचा या नेत्यांना छुपा पाठींबा असल्याचे समजले जात होते. वळसे पाटील आता अजित पवार गटात असल्याने या नेत्यांना आता थेट शरद पवारांच्या माध्यमातुन तालुक्यात राजकीय बांधिलकी जोपासावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या फूटी नंतर दोन तगडे मतप्रवाह निर्माण झाल्याने तालुक्याच्या राजकरणात मोठी चुरस निर्माण होणार आहे.
हेही वाचा