सातारा ; हरीष पाटणे : महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना सर्वाधिक बदनाम केले जाते, ज्यांच्या विरोधात स्वपक्षातून व बाहेरुनही कारस्थान रचली जातात तरीही महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेच्या ओठावर कायम त्यांचेच नाव घेतले जाते. त्या अजित पवार यांनी सातत्याने अशा कारस्थानांवर मात केली आहे. आजपर्यंत अजितदादा पवार यांच्यावर केलेले कोणतेही आरोप सिध्द झाले नाहीत, तरीही हा नेता अविचल आहे, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी झटत आहे. कारस्थानांना पुरुन उरत दादा तुम्हाला महाराष्ट्राचे एकखांबी नेतृत्व करायचे आहे!
'ते' वसकन अंगावर येतात…, 'ते' थेट नाही म्हणून सांगतात…, 'ते' फाड फाड बोलतात…, 'ते' लागलीच सस्पेंड करतात…, 'ते' संतापतात, चिडतात, आक्रस्ताळेपणा करतात… वगैरे वगैरे वगैरे! महाराष्ट्राच्या राजकारणात 'त्यांच्यावर' असे शेकडो आक्षेप आहेत.
कुणीही उठावं आणि त्यांच्यावर बोलावं, कालच्या शेंबड्या पोरांनीही त्यांची मापे काढावीत.
मात्र सोशल मीडियातील ट्रोलर्सनी, स्वकीयांमधील चापलूशी करणार्यांनी, कट्टर विरोधकांनी अजितदादा पवार यांच्यावर कितीही खासगी प्रहार केले तरी गेल्या कित्येक वर्षांत ते डगमगले नाहीत.
आज महाराष्ट्र संकटात असताना धाडसी झेप झुंजा त्यांनीच घेतल्या आहेत.
सातार्याचे मेडिकल कॉलेज कित्येक वर्षे प्रलंबित आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत 'माझ्या सातार्याचे मेडिकल कॉलेज झाले पाहिजे' असे म्हणून त्यांनी पुढच्या काही बैठकांमध्ये हा विषय धसास लावला.
अधिक वाचा :
कृष्णा खोरेची जमीनही मेडिकल कॉलेजसाठी द्यायला लावली. मेडिकल कॉलेजचा जटील प्रश्न मार्गी लागला तो फक्त अजितदादा पवार यांच्यामुळेच.
मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रियाही आता सुरु होईल. वित्तमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना सातारा जिल्ह्याला त्यांनी छप्पर फाडके निधींची घोषणा केली.
सातारच्या सैनिक स्कूलला अर्थसंकल्पात ३०० कोटींची तरतूद करुन बैठकांचा सपाटा सुरुच आहे.
महावितरणने थकीत बिलामुळे पथदिवे व पाणी पुरवठा योजनांचे कनेक्शन तोडले. त्यामुळे गावेच्या गावे अंधारात गेली.
मात्र, अजितदादांनी एका फटक्यात निर्णय घेवून कनेक्शन पुन्हा जोडण्याचे आदेश दिले. अंधारात गेलेला महाराष्ट्र पुन्हा प्रकाशमय झाला
तो अजितदादांनी घेतलेल्या निर्णयामुळे.
महाबळेश्वरच्या पर्यटन विकासाचा मजबूत प्लॅन अजितदादांनी हातात घेतला आहे.
मंत्रीमंडळ बैठकीत महाबळेश्वरला छप्पर फाडके निधी देवून सातार्यावरचे आपले प्रेम सिद्ध केले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत सातारा कमालीचा भयकंपीत झाला. पॉझिटिव्हीटी रेट राज्यात टॉपला गेला. मृत्यूचे थैमान माजले.
सगळेच जेव्हा अपयशी ठरले तेव्हा जिल्हावासियांनी अजितदादांनाच हाक मारली.
सातारा वाचवण्यासाठी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांना सोबत आणून अजितदादांनी साडेचार तास यंत्रणांचा घामटा काढला. दोष दिग्दर्शन केले.
मंत्री -आमदारांसह, पदाधिकारी -अधिकार्यांसह सर्वांनाच कामाला जुंपले. त्यांचे फॉलोअप घेतले.
पत्रकारांच्या प्रश्नांवर न चिडता खिलाडूवृत्तीने त्यांनी सातारा जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवून आणणारी यंत्रणा कार्यान्वयीत केली.
अधिक वाचा :
संपूर्ण महाराष्ट्र ठप्प होत असताना, अर्थवाहिन्या कमजोर झाल्या असताना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जावून तेथील जनतेचे दुखणे समजावून घेवून अजितदादा मार्ग काढताना दिसत आहेत.
कोरोनामुळे ठप्प झालेले जनजीवन सुरळीत होण्यासाठी त्यांच्यातला अर्थमंत्री प्रयत्न करताना दिसतो आहे.
त्यामुळेच वाडीवस्तीवरचा एखादा पोरगा थेट अजितदादांना फोन करतो 'दादा, डॉक्टर दवाखान्यात घेत नाहीत म्हणतो' आणि
अजितदादाही 'त्या डॉक्टरकडे जा आणि मला फोन लावून दे' असे म्हणतात.
वाडीवस्तीवरच्या अडलेल्या पोराचा प्रश्न चुटकीसरशी सुटतो. ते कॉलरेकॉर्डिंग व्हायरल होते.
अजितदादांचा ग्रामीण ठसका आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जातो तेव्हाच त्यांच्यातील पारदर्शकता महाराष्ट्राला स्पष्टपणे दिसते.
कुणीही काहीही म्हणो, सोशल मीडियावर त्यांच्या नावाने बेंबीच्या देठापासून ओरडो, शरद पवारांचा पुतण्या आहे म्हणून अजितदादांना लोकं ओळखतात अशा पध्दतीची त्यांच्यावर शेलकी शेरेबाजी करो.
कुणाच्या खालच्या पातळीवर जावून केलेल्या टोमण्यांनी दादा बिथरले नाहीत की त्यांनी जमीनही सोडली नाही ! जेव्हा अंथरुणात लोळत व्हॉटस्अॅपवर वाचाळवीर त्यांच्या नावाने बडबडत असतात तेव्हा हेच पवार पहाटे मंजूर केलेल्या विकासकामांची पाहणी करत असतात.
हा माणूस मुळात आहे असाच. जसा आहे तसा, आतबाहेर काहीही नाही, दडगे काही नाही, कणखर हृदयाचा, दिलदार स्वभावाचा. तितकाच हळवा, संवेदनशील. चुकीचं काही घडलं तर ओरडणारा आणि आपल्यावर अन्याय झाल्याची भावना होतेयं हे लक्षात आल्यावर 'आम्हीही माणसं आहोत' अस म्हणून मीडियासमोरही हुमसून हुमसून रडणारा !
जिथल्या तिथे हिशेब, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. कुणाला काय वाटेल याची पर्वा नाही, स्वत:चे निर्णय स्वत: घेणारा, त्या निर्णयांची प्रखर अंमलबजावणी करणारा व त्या निर्णयांची तड लावण्यारा.
स्वत:ची राजकीय कारकिर्द पणाला लावणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला वसंतदादांनंतरचा एकमेव नेता म्हणून महाराष्ट्र अजितदादा पवार यांच्याकडे पाहतो.
त्यामुळेच सोशल मीडियाने कित्येकदा ट्रोल करूनही स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर विरोधकांच्या छातीवर पाय देवून महाराष्ट्राच्या कणखर मातीत दादा नावाचा पहाड आपल्या दादागिरीने फेमस आहे. ती दादागिरी त्यांनाच शोभते, ते येर्या गबाळ्याचे काम नाही!
अधिक वाचा :
शरद पवारांवर कुणी चिखलफेक केली तर 'मला पण शरद पवारांचा पुतण्या म्हणतात, नादाला लागला तर नाद पुरा करीन' असे म्हणत पुंग्या टाईट करणारा. 'बघतोच यंदा तो कसा आमदार होतो' असे जाहीर विधान करत हजारोंच्या मतांनी त्याला पाडून आपला शब्द खरा करणारा ! जे होईल ते स्पष्टपणे सांगणारा जे होणार नाही ते तोंडावर फेकून मारणारा.
मित्रानं सांगितलं म्हणून पत्रकाराच्या गरीब मुलाला दत्तक घेणारा. खरं बोलायला कचरणार नाही आणि खोट्याला तोंडावर पाडायला कुणाच्या बापाला घाबरणार नाही. ज्याच्यावर जीव लावला त्याच्यासाठी शेवटपर्यंत जीवाला जीव देणारा, ज्याला डोक्यात ठेवला त्याचा योग्यवेळी परफेक्ट कार्यक्रम करणारा, दादाच !
महाराष्ट्राच्या राजकारणात दादांना कायम वादग्रस्त केले गेले. बदनामीची मोहीम अजितदादांच्या विरोधात काढली गेली.
कधी पक्षातून, कधी पक्षाबाहेरुन त्यांच्या विरोधात सोंगट्या फिरवल्या गेल्या, कारस्थाने रचली गेली.
राज्यात सरकारमध्ये ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री अशी पद्धत रुढ आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्येही शिवसेनेचे आमदार जास्त आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच आहे. अगदी शिवसेना-भाजपची युती असतानाही तसेच घडले.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा असेही घडले आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या काँग्रेसच्या आमदारांपेक्षा जास्त होती तेव्हा राज्याचे मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्यात आले होते.
वास्तविक त्यावेळेस राष्ट्रवादीकडे नैसर्गिक न्यायाने राज्याचे मुख्यमंत्रीपद येत होते व पवार यांना राष्ट्रवादीच्या आमदारांचे जोरकस समर्थन होते.
मात्र, केवळ पक्षादेश म्हणून अजितदादांना त्याग करावा लागला. त्याची नोंद ट्रोलर्स अथवा अन्य कुणी ठेवत नाहीत हे महाराष्ट्रातील अजितदादाप्रेमींचे दुर्दैव आहे.
७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप केला गेला. प्रत्यक्षात आरोप सिद्धच झाले नाहीत.
मात्र, बदनामीची मोहीम राज्यभर चालवली गेली.
राज्य सहकारी बँकेची सत्ता त्यांच्याकडे असताना केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला व अजितदादांना बदनाम करण्यासाठी आघाडीतूनच प्रयत्न केले गेले. एकमेकांच्या भांडणात तेव्हा सरकार गेले. आरोप सिद्ध झालेच नाहीत.
गावाकडे, खेड्यापाड्यात पाणी नसलं तर 'पाऊसच नाही तर आता काय धरणात ….. का? असा बोली भाषेत उद्वेग व्यक्त केला जातो.
'बडे-बडे शहरों में छोटे-छोटे हादसे होते है।' असे म्हटले म्हणून ज्यांचे गृहमंत्रीपद गेले ते आर. आर. आबा मनाने एवढे वाईट होते का?
हिंदी कच्चे होते एवढाच काय तो त्यांचा दोष? मात्र, ट्रोलर्सनी केवळ भाषेतल्या विसंगतीवर बोट ठेवत त्या महामानवाचे मंत्रीपद घालवले होते.
आज आर. आर. आबा नसल्याची मोठी किंमत महाराष्ट्राला भोगावी लागत आहे हे त्यावेळचे टिकाकारही पश्चातापाने मान्य करतात. दादांच्या बाबतीतही नेमके तेच झाले होते.
समोर बसलेली माणसं त्यांच्या जीवाभावातली होती, रोजच्या उठण्याबसण्यातली होती, त्यातून ते बोलून गेले होते.
मात्र, जलसंपदामंत्री असताना याच पवारांनी महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यात बांधांपर्यंत पाणी फिरवले.
याकडे सोयीस्कर डोळेझाक केली गेली.
एका वाक्यामुळे त्यांचे काम न पाहता त्यांच्यावर चिखलफेक केली गेली. त्यांचे मंत्रीपद घालवले गेले.
महाराष्ट्रातल्या पोरीबाळी पळवण्याची भाषा जेव्हा झाली, सैनिकांच्या पत्नींबाबत अश्लील भाष्य झाले तेव्हा मात्र एवढे घाणेरडे बोलणार्यांचे राजीनामे झाले नाहीत.
तिथे विरोधकांच्या जीभा बोथट झाल्या होत्या का?
संवेदनशील राजकीय नेतृत्वांवरच राळ उडवली जाते, त्यांना बदनाम केले जाते, त्यांच्याविरोधात कारस्थाने केली जातात.
जेव्हा ते शरण येत नाहीत तेव्हा मरणप्राय यातना दिल्या जातात.
दादांच्या बाबतीतही अनेकदा तसेच घडत आले आहे. आताही तोच प्रयोग सुरु आहे.
अजितदादा, तुमच्या विरोधात कारस्थाने नवीन नाहीत. तुम्हाला मुख्य सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हरतर्हेचे प्रयत्न यापुढेही होतील.
मात्र, कुणी कितीही ट्रोल करू दे, अजितदादा तुम्ही आहे तसेच रहा. तुमच्या फटकळ स्वभावावर बोलणारी मोजकी आहेत.
महाराष्ट्राला तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडतो त्यावर जीव ओवाळून टाकणारे कोट्यवधी आहेत.
कारस्थानांना पुरुन उरत असेच महाराष्ट्राचे संकटमोचक रहा, असेच निर्णायक रहा, असेच जलदगती रहा, 'मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की….,'
हे शब्द ऐकण्यासाठी महाराष्ट्राची खेडीपाडी, तुमच्याच बोली भाषेत बोलणारी ग्रामीण जनता त्या दिवसाची वाट पहात आहे. कारस्थाने हाणून पाडत तो दिवस उजाडो, याच त्याना ६२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
हे ही वाचा :
हे ही पाहा :