नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींची समज, ‘सरकार अडचणीत येईल, असे वक्तव्ये करू नका’ | पुढारी

नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींची समज, 'सरकार अडचणीत येईल, असे वक्तव्ये करू नका'

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मंगळवारी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांनी कानउघाडणी केली. राज्यातील सरकार अडचणीत येईल, असे वक्तव्ये करू नका, असे त्यांनी नाना पटोले यांना बजावले आहे.

पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडे पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि नाना पटोले यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. राज्य सरकार अडचणीत येईल, अशी वादग्रस्त वक्तव्ये करू नका, अशा शब्दांत एच. के. पाटील यांनी बजावले.

आक्रमक भूमिकेची गरज : पटोले

पटोले यांनी आपली बाजू एच. के. पाटील यांच्यापुढे मांडली. काँग्रेस जरी सत्तेत असली, तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना झुकते माप दिले जाते. शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वबळाची भाषा करतात; पण काँग्रेसकडून तसे झाले तर तक्रार करतात, त्यामुळे आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे, असे पटोले यांनी पाटील यांना सांगितले.

‘तो’ विषय संपला : एच. के.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाची माध्यमांनी मोडतोड करून ते दाखविल्याने गैरसमज निर्माण झाला. त्यांना काय म्हणायचे होते याचा खुलासाही त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्याचा रोख केंद्र सरकारकडे होता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा विषय आता संपला आहे, असे सांगत पाटील यांनी पटोले यांना माध्यमांपुढे सावरण्याचा प्रयत्न केला.

Back to top button